जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात

0

नंदुरबार । कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी राजभाषा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो. जिल्हाभरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्येही मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त सरस्वती माता व वि. वा. शिरवाडकर यांचा प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कुसुमाग्रजांचे योगदान मोलाचे
नवापूर महाविद्यालयात प्राचार्य विनोदकुमार पाटील, उपमुख्याध्यापक भरत आर पाटील, उपप्राचार्य एस आर पहुरकर, पर्यवेक्षक हरीश पाटील, पर्यवेक्षिका सावित्री पाडवी, पर्यवेक्षिका कमल कोकणी, जेष्ठ शिक्षक उमेश पाटील, जे के वाघ, मराठी विभाग विषय प्रमुख सुभाष पाटील, अशोक रजाळे, किरण चौधरी, वैशाली पाटील, सुनिता गावीत, दिपाली कुवर, हेमंत पाटील, प्रशांत पाटील तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. मराठी ही आपली मायबोली आहे. या भाषेतून घेतलेले शिक्षण आपल्याला ज्ञानसंपन्न करते. कुसुमाग्रजांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे, अशी प्रतिक्रीया शिक्षकांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी मांडले विचार
शहादा – सोनामाई शि.प्र.मंडळाच्या कला व विज्ञान महिला महाविद्यालयात विविध कार्यकामांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष महाले तर प्रमुख वक्ते नाईक महाविद्यालयचे उपप्राचार्य डॉ. हिरालाल पाटील होते. मराठी भाषेच्या गौरवासंबधी या प्रसंगी प्रमुख वक़्ते व अध्यक्षांसहित मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रेमसिंग गिरासे, इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका हेमांगी कुळकर्णी, शिक्षकेतर वृंदातर्फे महाविद्यालयचे वरिष्ठ लिपिक श्री राजेश राठोड व विद्यार्थिनींतर्फे विद्यापीठ प्रतिनिधि राधिका पाटील यांनी विचार मांडले.

आज निबंध स्पर्धा
शेवटी सर्व विद्यार्थिनींना कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसानिमित्त चॉकलेट वाटप करण्यात येऊन आजच्या कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली. उद्या मराठी ग्रन्थ-प्रदर्शन , मराठी कविता-लेखन-स्पर्धा व ‘ मराठी असे आमुची मायबोली ‘या विषयावर निबंध-लेखन-स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.