धुळे । राज्यभरातील शेतकरी 1 जूनपासून संपावर गेले आहेत. यात धुळे जिल्ह्यातील शेतकरी देखील सहभागी झाले आहेत. या संपकरी शेतकर्यांनी महामार्गावरुन जाणार्या दुधाच्या गाड्या आणि भाजीपाल्याच्या गाड्या रोखून धरल्याने धुळ्यासह राज्यभरातील बाजारपेठांमध्ये शुकाशुकाट दिसून येत आहे. भाजीपाला आणि दुधाची तीव्र टंचाई उद्यापासून जाणवायला लागेल. संप करणार्या शेतकर्यांनी अनेकठिकाणी रस्त्यावर दुध ओतून निषेध व्यक्त केला आहे. आंदोलकांनी भाजीपालाही रस्त्यावर फेकला आहे. धुळ्यासह राज्यभरात शेतकरी संपावर गेल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसत होता.
मुंबई-आग्रा महामार्गावर भाजीपाला, दूधाच्या अडविल्या गाड्या
आंदोलन करणार्या शेतकर्यांनी शेतमाल बाजार समितीपर्यंत पोहचूच दिला नाही. महामार्गावरच भाजीपाला आणि दूधाच्या गाड्या आडविल्या. त्यामुळे भाजीपाल्याचे दर संपाच्या पहिल्याच दवशी कडाडले आहे. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर देवभाने गावाच्या फाट्याजवळ शेतकर्यांनी आंदोलन केले. धुळ्याकडे येणारा भाजीपाला, दूध रोखून धरले. कापडणे गावात दूध संघाचे कार्यालय असून त्यांना देखील दूध विक्रीस मनाई करण्यात आली. शेतकर्यांच्या संपाचा इफेक्ट धुळ्यात संध्याकाळी निश्चित दिसून येईल. आजचा दिवस कसाबसा भागवला जाईल. मात्र, उद्यापासून परिस्थिती भयानक होईल. बाजार समितीत भाजीपाला आणि दूध विक्रीस येणार नसल्याने दूधाची तिव्र टंचाई भासेल तर व्यापार्यांनी साठविलेला भाजीपाला उद्या किरकोळ बाजारात चढ्या भावाने विकला जाण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने
धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यायलासमोर लोकक्रांती सेनेने शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत भजनी आंदोलन केले. इंदोर आग्रा महामार्गावर शेतकर्यांनी वाहने अडवून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. या भागात अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले असून दूध आणि शेतमाल रस्त्यावर फेकून त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. आज प्रामुख्याने नगर,नाशिक जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र बंद असून त्याचा परिणाम दूधाच्या वितरणावर होत आहे. लासलगाव येथे बाजारपेठ ठप्प शेतकर्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल झालेत. कांदा लिलाव बंद पडला आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील विक्रीला जाणारा कांदा रस्त्यातच अडवून फेकुण्यात आला आहे.