धुळे। शहरासह जिल्ह्याभरात आज वाजत गाजत पांरपारीक पध्दतीने सर्वांचे लाडके दैवत विघ्नहर्त्या गणरायांचे आगमन झाले आहे. धुळे शहरातील बाजारपेठ या शुभदिनी आकर्षक गणेश मुर्ती, पुजा साहित्य, सजावटीचे साहित्य आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. शहरात साडे तीनशेहून अधिक विक्रेत्यांनी मूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारले आहेत. शहरातील फुलवाला चौकासह खोलगल्ली या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. सकाळी 7 वाजेपासूनच वाजतगाजत गणेशमूर्ती घरी नेण्यात येत होत्या. गणेशोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरूवारपासूनच बाजारपेठेत चैतन्य संचारले होते. पूजेच्या साहित्यासह सजावटीचे साहित्याची दुकाने दोन दिवसांपासून शहरातील मुख्य आग्रा रस्त्यावर उभारली आहेत. फुलवाला चौक ते महाराणा प्रताप चौक रस्ता आग्रा रस्त्यावर रणसिंग चौकापर्यंत गणपतीमूर्ती विक्रीची दुकाने आहेत. या भागात रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. गर्दी लक्षात घेत पोलिसांनी बाजारपेठ परिसरात वाहनांवर बंदी ठेवली होती.
शिंदखेडा तालुक्यात चोख बंदोबस्त
गणेश भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून गणरायाचे स्वागत केले. शिंदखेडा पोलीस स्टेशन अंर्तगत तीस गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. त्यात पंचवीस गणेश मंडळ शहरातील व पाच ग्रामीण भागातील आहेत. या शिवाय अनेक गणेश मंडळांनी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची हमी घेत गणरायाची स्थापना केली आहे. घरोघरी देखील गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. बंदोबस्तासाठी 47 पोलीस कर्मचारी व पाच अधिकारींनी कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. यांत वीस पुरुष होमगार्ड, दहा महिला होमगार्ड, सतरा पोलीस कर्मचारी, पाच अधिकार्यांचा समावेश आहे. शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.के.रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.जी.पोतदार, व्ही.डी.पाटील, बी.जे.शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.एन.चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दोंडाईचात ’श्री’ ची स्थापना : शहरात गणेश भक्तांची सकाळ पासुन ’श्री’ च्या स्थापनेची उत्साहात तयारी करण्यात येत होती. अबाल वृध्दांमध्ये लाडक्या दैवताला घरी घेवुन जाण्यासाठी लगभग दिसुन आली. सकाळ पासुनच विक्रेतांकडे गणेश भक्तांनी मुर्ती घेण्यासाठी गर्दी केली. दोनशे रूपयापासुन तर वीस हजार रूपया पर्यत गणेश मुर्त्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. परिसरातील निमगुळ, मालपुर, विरदेल, रामी, पथारे, वणी तर सारंगखेडा येथील मोठ्या मंडळांनी दोंडाईचा येथुनच मुर्तीची खरेदी केली.
4 गावात ’एक गाव एक गणपती’ : साक्री तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात 27 मंडळांनी परवानगी घेऊन गणपती बसवले आहेत. ’एक गाव एक गणपती’ 4 गावात बसवले आहेत. ग्रा.पं.निवडणूक असलेल्या पुढारीनी मंडळांना आर्थिक मदत दिली आहे. तालुक्यातील भाडणे, वसमार, धाडणे,कासारे आदी ठिकाणी गणपती बसवणार्यांची संख्या वाढली आहे. पोलीस उपअधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस निरीक्षक आर.एस.पाटील, पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार पाटील, नरेंद्र कचवा यांच्यासह पोलीस पथक तैनात होते.
17 गणेश मंडळाची नोंदणी
साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर जैताणे गावात 17 गणेश मंडळाची निजामपुर पोलीस ठाण्यात नोदणी करण्यात आल्याची माहिती स पो नि दिलीप खेडकर व संबधित पोलीस हवालदार मयुर सुर्यवंशी यांनी जनशक्तीशी बोलतांना दिली. निजामपुर गावात 9, जैताणे गावात 8 मंडळाची नोंदणी करण्यात आली आहे. आई तुळजाभवानी, प्रगती फाँऊडेशन, श्री एकता, युवक गणेश मंडळ, झुझार गणेश मंडळ, सिधदी विनायक, एकता गणेश, नव आदर्श, जय श्रीराम, न्यू अष्टविनायक, सामना गृप, ओम साई, जयभवानी, जय शिवाजी, सिध्दी विनायक या मंडळांची नोंदणी निजामपुर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.