जिल्हावासिय वावरताहेत गुन्हेगारांच्या दहशतीत

0

(किशोर पाटील) – जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीचा सध्या प्रत्येक सामान्य नागरिकाला सतावणारा विषय आहे. चोर्‍या, घरफोड्या सोबत भरदिवसा गोळीबार, खूनाच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. ज्या पोलीस अधीक्षकांवर जिल्ह्याची सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांचा गुन्हेगारांपेक्षा जास्त कर्मचार्‍यांवर वचक असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्याच्या सुरक्षेची अपेक्षा करणे, हे म्हणजे मुंगीकडून हत्तीला मारण्याची चमत्कारीक अपेक्षा करण्यासारखेच आहे. आता ज्या माणसाकडून अपेक्षाच नाही त्यावर काय बोलायचे…असो. काल परवा, जिल्ह्यात विशेष पोलीस महानिरिक्षक छेरींग दोरजे जिल्हा दौर्‍यावर येत असल्याचे समजले. खूप आनंद झाला, आणि थोडी फार का होईना भिती नाहीशी झाली. आयजी साहेब या…जळगावकर तुमची आतुरतेने वाट पाहत आहे… आणि आय जी साहेब तुम्हीच आता आम्हाला गुन्हेगारी तसेच गुन्हेगारांपासून वाचवा…अशी एकच आर्त हाक जिल्हावासियाच्या तोंडून एैकायला मिळत आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून गुन्हेगार, चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दुसर्‍या महिन्याला सुरुवात झाली तरी चोर्‍या, घरफोड्या, लूट यासारख्या घटनाना थांबण्याचे नाव घेत नाही. थांबतील ही कशा, तशी पोलिसिंगच राहीलेली नाही. पोलिसांचा कुठलाही धाक किंवा वचक राहिलेला नाही. त्यामुळे आता दिवसाही चोरी चोरट्यांनी दंडच धोपटले. चापटा बुक्याच्या मारहाणीची जागा आता धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने घतली आहे. त्यामुळे पोलिसांची कुठलीही भिती न राहिल्याने किरकोळ मारहाणीत बंदूकाही बाहेर निघाल्याच्या काही घटनांवरुन समोर आले आहे. त्यामुळे जिल्हावासिय गुन्हेगारांच्या दहशतीत असल्याचे सद्यस्थितीतील चित्र आहे. आता मारहाणी, चोर्‍या समजल्या मात्र साकळी, उमाळा येथील दंगलीच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गुप्तचर यंत्रणा असूनही त्यांना गोपनीय माहिती दोन गट आमने सामने येतात, याला काय म्हणावे, पोलिसांच्या निगरगठ्ठपणाने कळस च गाठला. साकळी तील ही काही पहिली घटना नाही, यापूर्वीही घटना घडल्या आहेत. मात्र त्यातून जिल्हा पोलीस दलाने कुठलाही धडा घेतलेला नाही. एक प्रकारे घटना घडण्याचीच जणू पोलीस वाट पाहतात की काय, असाही संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. घटना घडली गुन्हे दाखल करावयाचे. डझनभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावयाचा. एवढेच सोपस्कार पोलीसाकडून पार पाडले जातात. पुन्हा असा वाद होवू यामागची कारणे शोधली जावून त्यापध्दतीने उपाययोजना का केल्या जात नाही, याबाबत आश्‍चर्य आहे. दोन गटात एकोप्याची भावना नसेल तर किरकोळ कारणही दंगलीसाठी पुरेसे आहे.
दुसरी गंभीर बाब म्हणजे अधिकारी नव्हे तर राजकीय पुढारी जिल्हा चालवित असल्याचे काही घटनांवरुन समोर आले आहे. राजकीय पुढार्‍याच्या दबावाखाली पोलीस अधिकारी काम करत असल्याची शोकांतिका आहे. जळगाव शहरातील रंगेल पार्टी प्रकरण असो की उमाळा येथील अपघाताच्या घटनेनंतर गाडीची तोडफोड, मारहाण या प्रकरणातही एका सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याच्या आदेशानंतर कुठलीही चौकशी न करता राजकीय पुढार्‍यांच्या आदेशानेच सोयीस्करपणे फिर्याद बनवून, संशयित असतानही कार्यकर्ते, परिचितांना त्यातून वगळून इतरांवर गुन्हे दाखल होत असतील मग आयपीएस पोलीस अधिकार्‍यांची गरजच काय असाही सवाल उपस्थित होतो. ‘आयपीएस’ म्हणजे अधिकारी होवून मिरवणे नव्हे. 26 ऑक्टोबर 1947 पासून जिल्ह्याला लाभलेले तत्कातीन आयपी आणि आयपीएस यांच्या नामावलीवर नजर टाकली असता एस.एस.विर्क, अरुप पटनाईक, आर.आर.खिल्लानी, दीपक जोग, के.एल.बिष्णोई, टी.एस.भाल, संतोष रस्तोगी यांनी केलेल्या कामगिरीच्या जवळपासही विद्यमान पोलीस अधीक्षक पोहचतील का, हा प्रश्‍न जनतेच्या मनात अजुनही अनुत्तरीत आहे.