कल्याण : बिर्ला कॉलेज येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा परिषद क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये 27 गावांतील शाळांना सहभागी करून न घेतल्याने शाळांमध्ये नाराजीचा सूर होता. हीच बाब नगरसेवक महेश पाटील यांना समजली असता त्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन स्पर्धा बंद पाडत जाब विचारला. या स्पर्धेमध्ये सर्व शाळांना एंन्ट्री द्या, असे आयोजकांना खडसावले. त्यानंतर आयोजकांनी सामंजस्याची भूमिका घेत 27 गावातील शाळांनाही सहभागी करून घेण्यात आले. महानगरपालिकेच्या फुटबॉल स्पर्धांना जिल्हास्तरीय दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला 2008 सालात यश प्राप्त झाले. या पूर्वी 27 गावे केडीएमसीच्या बाहेर होती. मात्र ही गावे केडीएमसी अंतर्गत आल्याने या गावांतील शाळांमधल्या खेळाडूंना देखील जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी करून घेणे क्रमप्राप्त होते. गेल्या दोन वर्षांपासून हे खेळाडू ग्रामीण भागात तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होत असत. मात्र केडीएमसी अंतर्गत 27 गावे आल्याने त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी डावलले जात असल्याचे दिसून येत होते.
आयोजकांना खडसावले
कल्याण -डोंबिवली महानगरपालिका, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हापरिषद क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. मात्र 27 गावातील शाळाना सहभागी न करून घेतल्याने शाळामध्ये नाराजीचा सूर होता. ही बाब 27 गावातील प्रभाग क्रमांक 82 चे नगरसेवक महेश पाटील याना समजताच त्यांनी थेट बिर्ला कॉलेज गाठत आयोजकांना जाब विचारला आणि स्पर्धेमध्ये सर्व शाळांना सहभागी करून घ्या असे खडसावले. त्यानंतर महेश पाटील यांच्यासह बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेश चंद्र यांनीही मध्यस्थी करून हा प्रश्न सोडविला. प्रशासनाची बाब बाजूला ठेवा, पण ग्रामीण भागातील खेळाडूंवर अन्याय नको, यावर उभयतांमध्ये एकमत झाले.
12 संघानी घेतला सहभाग
सदर स्पर्धेत 27 गावातील 7 शाळांतील 12 संघांनी आता सहभाग घेतला आहे. पालिका हद्दीतील जवळपास 30 ते 40 संघ सहभागी झाले आहेत. गुरूवारी पार पडलेल्या 17 वर्षांखालील मुलींचा डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर विद्यालयाचा संघ विजेता, तर कल्याणच्या गुरू नानक शाळेचा संघ उपविजेता ठरल्याचे क्रीडा समिती सदस्य तथा कल्याण तालुका शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे यांनी सांगितले.