जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सवाचे आयोजन

0

जळगाव । भुलोजी आणि भुलाबाईला साक्षात शंकर आणि पार्वतीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. भुलाबाई काळात मुली एकत्रित येवून भुलाबाईचे गाणे गात घरोघरी हिंडायच्या यातून एकमेकींचे नाते आणि एकोपा वाढण्यास मदत होत असे तर भुलाबाईच्या गाण्यातून एक सशक्त, सुसंस्कृत परिवाराची जडण-घडण करण्यात महिलांना बळ मिळत होते. परंतु आधुनिक युगात हा संवाद लोप पावत आहे आणि या लोकपरंपरेस उतरती कळा लागली आहे. अशा स्त्री केंद्रित उत्सवाचे महत्व जाणून स्व.डॉ.अविनाश आचार्य यांनी भूलाबाई उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली, आज या उत्सवाचे एका महोत्सवात रुपांतर झाले आहे. त्याअनुषंगाने येत्या रविवारी 17 सप्टेंबर रोजी केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला अकादमीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव या नृत्यगीतांची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आयोजित करण्यात येते असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

महोत्सवाचे 16 वे वर्ष ः यंदा या महोत्सवाचे 16 वे वर्ष साजरे होत आहे. कान्हदेशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे. महिलांच्या आत्मीयतेचा आणि सर्वात प्रिय असलेला हा सोहळ्याचे रविवारी सरदार वल्लभ पटेल लेवा भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटात होत असून प्रत्येक गटात 12 ते 15 मुलींची संख्या असणार आहे. 5 ते 65 वयोगटातील 35-40 संघांचा सहभाग स्पर्धेत असणार आहे. यात शाळा, महाविद्यालय तसेच खुल्या गटांना यात सहभागी होता येणार आहे.

पारितोषिक देण्यात येणार
पत्रकार परिषदेस स्पर्धा प्रमुख अनिता वाणी, ललित कला अकादमी प्रमुख पियुष रावल, रेवंती शेंदुर्णीकर आदी उपस्थित होत्या. महोत्सवात विजेत्यांना प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येते. प्रथम विजेत्या गटाला 1501, द्वितीय 1001, तृतीय 701 तर उत्तेजनार्थ 501 रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितली.

यांची राहणार उपस्थिती
भुलाबाई महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील नावापुर येथे ग्रामविकासाच्या क्षेत्रात सक्रीय असलेल्या दुर्गा गावित, जैन समूहाच्यानिशा जैन, नयना पाटकर उपस्थित राहणार आहे. तर समारोपाच्या वेळेस आयएमआर कॉलेजच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे, जळगावच्या सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रियंका बोकील आणि बालकल्याण समितीच्या सदस्या माया काळे उपस्थित राहणार आहे.

ज्वलंत प्रश्‍नावर भाष्य
यात भुलाबाईच्या गाण्यांना अग्रक्रम देण्यात येणार असून सध्याच्या चालू घडामोडींवर समाजोपयोगी संदेशाला प्राधान्य असणार आहे. महोत्सवाच्या माध्यमातून भुलाबाईंच्या गाण्यांना प्राधान्य देवून समाजप्रबोधनाचे एक व्यासपीठ प्रस्तापित करण्यात केशवस्मृती प्रतिष्ठानला यश प्राप्त झाले आहे. जळगाव शहरात साजरा होणारा भुलाबाई महोत्सव हा अशा स्वरूपात महराष्ट्रात कुठेही साजरा होत नाही. शाळा महाविद्यालय आणि खुल्या गटात सर्वांना भुलाबाईचे गीत व नृत्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते.