जळगाव । कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवरील अन्याय दूर करावा व शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश त्वरीत पारित कराव्या, अशी मागणी करीत आज धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.ए.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गेल्या पाच वर्षापासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागी नियुक्त केलेल्या शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून वेतनासह मान्यता देण्यात याव्यात. माहिती तंत्रज्ञान विषय2001 पासून सुरु झालेला आहे. गेल्या 17 वर्षापासून विनावेतन काम करणार्या शिक्षकांबद्दल शासनाची उदासिनता दिसून येत आहे. जग आधुनिक तंत्रज्ञानाकडे जात असतांना या विषयांच्या शिक्षकांना मात्र अद्याप वेतन मिळत नाही. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीनस्तर 10 अधिक 2 स्तरअस्तित्वात येवून 42 वर्षे झालीत मात्र अद्यापही प्रशासन व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आलेली नाही.
2 फेब्रुवारी राज्यभर कनिष्ठ महाविद्यालय बंद
शिक्षण सेवकांच्या मानधनात गेल्या 10 वर्षापासून कोणतीही वाढ केलेली नाही. ते दुप्पट करण्यात यावे. शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी द्यावी. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व शिक्षकांना अशैक्षणिक कामे देवू नयेत. आदी मागण्या आहेत. शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा 18 जानेवारीला शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा तसेच 2 फेब्रुवारीला राज्यभर कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.