जिल्हा कारागृहासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कारवाईच्या रडारवर

0

कैद्यांना रुग्णालयात दाखल करुन व्हीआयपी ट्रीटमेंट ; अहवाल राज्यस्तरीय प्रमुखांकडे पाठविणार ; पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची माहिती

जळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज विजीट दिली. यात कारण नसताना कैदी दाखल असल्याचे आढळून आले. यापूर्वी अनेकदा असले प्रकार समोर आला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तथा शासकीय महाविद्यालय व जिल्हा कारागृह यांच्या अधिकारी कर्मचार्‍यांमध्ये मिलीभगत असल्याने त्यातून यापूर्वी असले प्रकार घडत असल्याचा अधीक्षकांना संशय आहे. जिल्हा कारागृहासह जिल्हा रुग्णालयात तथा शासकीय महाविद्यालय या दोन्ही विभागांवर कार्यवाहीसाठी राज्यस्तरीय प्रमुखांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली.

कारागृहाच्या अधिकार्‍याच्या झाली होती उचलबांगडी

  • कारागृहात याआधी एका कैद्याकडे गांजा आढळून आला होता तर तत्कालिन उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या व महासंचालकांच्या पथकाच्या अचानक भेटीत कैद्यांकडे मोबाईल, गुटखा व इतर साहित्य आढळून आले होते. गांजाप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हाही दाखल झाला होता व यात एका अधिकार्‍याची उचलबांगडी झाली होती.
  • दोन दिवसापूर्वी राकेश चव्हाण हा मद्याच्या नशेत होता. त्याने मद्यप्राशन कारागृहात आल्यावर केले की बाहेर याची चौकशी सुरु आहे. मात्र कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही गेटच्या मध्ये असताना तो सिगारेटही ओढत होता. कारागृहाच्या आतही अनेक गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. काही मोजक्या कैद्यांचे लाड पुरविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या चेतन आळंदे उर्फ चिंग्या याने देखील न्यायालयात कारागृहातील गैरप्रकाराची माहिती सांगितली होती.

कैदी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले
कारागृहातून कैद्याला बाहेर काढण्यापासून तर रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत काही विशिष्ट आरोपींच्या बाबतीत राजकीय हस्तक्षेप तर होतोच, मात्र आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतो. रुग्णालयातील कैदी कक्षात या आरोपींचे सारे लाड पुरविले जातात. मध्यंतरी झालेल्या प्रकाराबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तेव्हा काही अंशी या प्रकाराला आळा बसला होता, आता परत आरोपी रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

कोट..
जिल्हा रुग्णालयात सरप्राईज भेट दिली तेव्हा एक आरोपी गरज नसताना दाखल असल्याचे आढळून आले. त्याबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली होती. आरोपी दाखल करण्याचे अधिकार आता अधीष्ठातांकडे आले आहेत. तरीही असे प्रकार होत आहेत. कारागृहाच्याबाबतीही अनेक तक्रारी आहेत. पोलिसांवर आपण कारवाई करुच, परंतु रुग्णालय व कारागृहाच्या बाबतीत सविस्तर अहवाल व काही पुरावे दोन्ही विभागांच्या वरिष्ठांकडे पाठविले जाणार आहेत.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक