महिनाभरात न्यायालयात 31 कौटुंबिक खटले निकाली
महिलादिनी मनोमिलन झालेल्या दाम्पत्यांचा भेट वस्तू देवून सत्कार
जळगाव- शहरातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात कौटुंबिक न्यायालयाची स्वतंत्र रचना करण्यात आली आहे. यात प्रलंबित असलेले 1150 खटले जिल्हा न्यायालयातून वर्ग झाले असून यापैकी फेब्रुवारी अखेर 31 कौटुंबिक खटले निकाली निघाले आहेत. न्या. चित्रा हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी सहा दाम्पत्यांचे तुटणारे संसार पुन्हा फुलविले असून तडतोडीअंती त्यांच्यात समेट घडवून आणला आहे. अशा सहा दाम्पत्यांचा महिनादिनी कुटूंब न्यायालयातर्फे विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
जिल्हा न्यायालयातच अनेक वर्षापासून कुटुंब खटले प्रलंबित होते. शासनाच्या मार्गदर्शनानुसार ते लवकरात लवकर निकाली निघावेत. तडतोड अथवा निर्णय होवून अथवा खटले निकाली काढून त्यांना स्वतंत्रपणे पुन्हा न्याने जीवन जगता यावे, यासाठी स्वतंत्र कुटुंब न्यायालयाची रचना करण्यात आली आहे. नवीन बी.जे. मार्केटमध्ये दुसर्या मजल्यावर 21 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील पहिले कुटुंब न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. यात न्या.चित्रा हंकारे, समुदेशक म्हणून अर्चना चिकने तसेच प्रबंधक पी.एन. रोझतकर यांच्यासह कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्र असून यात प्रलंबित 1150 खटले वर्ग झाले होते. फेब्रुवारी अखेर यात 31 खटले निकाली निघाले आहेत.
तेरा मंगल…सबका मंगल होय रे
प्रत्येक दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबियांचा विचार करावा, स्वतःच्या आयुष्याचा विचार करावा, मुलांचा विचार करावा, यावर आधारीत काही कविता तसेच सुविचार कुटूंब न्यायालयाच्या न्या. चित्रा हंकारे यांच्या संकल्पनेतून आवारात दर्शनी भागात लावले आहे. विशेष म्हणजे सर्वांचे चांगले व्हावे, या भावनेतून तेरा मंगल…मेरा मंगल…सबका मंगल होय रे या विश्व प्रार्थनेने कुटुंब न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात होते.
महिनादिनी दाम्पत्यांचा सत्कार
न्यायालयात तडजोडी अंती नांदण्यास तयार झालेल्या सहा दाम्पत्यांचा महिनादिनी प्रा. दगा बच्छाव यांच्या हस्ते भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी न्या. चित्रा हंकारे यांनी दाम्पत्यांमधील महिलांची खण- नारळाने ओटी भरली. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचीही सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार न्यायालयाच्या न्या.देशमुख एम.ए, न्या.शेख.आर.एस, दिवाणी न्यायालयाच्या न्या. ए.व्ही.कस्तुरे, एस.आर.गायकवाड, डॉ. नंदा जैन, भाग्यश्री पाईकराव उपस्थित होते. यावेळी सासु सुनेवरील भारुडही सादर झाले. इंगळे यांनी जागृतीवर गीत सादर केले. सूत्रसंचाचन अनुराधा वाणी तर आभार श्रीमती शर्मा यांनी मानले.