जळगाव । महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांना उत्कृष्ट कामाबद्दल गौरविले. राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त, शिक्षण आयुक्त, सर्व विभागाचे क्रीडा उपसंचालक, सर्व जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी, सर्व विद्यापीठाचे क्रीडा संचालक यांची सभा मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री ना.विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सभेत मिशन फुटबॉल कार्यक्रमांतर्गत राज्यात सर्वात जास्त शाळांची नोंदणी, स्ट्रीट फुटबॉल, सेल्फी पॉईन्ट, तालुकावार स्पर्धा यांचे सादरीकरण व उपक्रम राज्यात सर्वात जास्त व प्रभावीपणे राबवून राज्यात प्रथम क्रमांक जळगाव जिल्ह्याला मिळवून दिल्याबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांचा जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, सॉफ्टबॉलचे डॉ.प्रदीप तळवेलकर, व्हॉलीबॉल संघटनेचे प्रा.देवदत्त पाटील, सुपर सेव्हन क्रिकेटचे शंकर मोरे, टेनिस बॉल क्रिकेटचे वासेफ पटेल, इकबाल मिर्झा, मिनी गोल्फचे सुमेध तळवेलकर, क्रीडाधिकारी खांडेकर, प्रताप कोळी यांच्या उपस्थितीत झाला.