जळगाव । शेतकर्यांना खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे, खते व औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी शासनाची यंत्रणा दक्ष आहे. कुठेही तुटवडा भासणार नाही याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. तथापि शेतकर्यांनी जागरुकपणे बियाणे खरेदी करावी. तसेच बोगस बियाणे खते विक्री होत असल्याचे आढळल्यास शेतकर्यांनी तक्रारी कराव्या. नागरीकही याबाबतीत कृषी विभागाकडे तक्रारी करु शकतात. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथे केले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आयुक्त जीवन सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद अंतुर्लिकर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन एम.बी.शहा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.आर. पाटील, बीएसएनएलचे जगन्नाथ किनगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, अॅड.मंजुळा मुंदडा, विजय मोहरीर, प्रकाश दलाल, नरेंद्र पाटील, जे.एन.भोकरे, मुलचंद नाईक, श्रीमती एम.बी.वाणी आदी उपस्थित होते.
अशासकीय सदस्यांना सहकार्याचे आवाहन
यावेळी हॉटेल्स मध्ये उपलब्ध असलेले पिण्याचे पाणी हे पिण्यायोग्य असल्याचे फलक लावले पाहिजे. त्यासाठी अन्न व औषधे प्रशासन विभाग समितीचे अशासकीय सदस्यांची संयुक्त पाहणी मोहिम शहरात राबवावी. त्यासाठी मनपाचाही सहभाग घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिले. त्याच प्रमाणे पाणीपुरी विक्रेत्यांकडील पाण्याची तपासणी व्हावी व तसा अहवाल समितीस सादर करावा. यावेळी वीज ग्राहकांच्या असणार्या विविध तक्रारींसंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांची स्वतंत्र बैठक बोलावण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी दक्षतेने प्रयत्न करावे, त्यांना अशासकीय सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी यावेळी केले.