धुळे। धुळे जिल्ह्यात दारुबंदी करावी, ठराव झालेल्या गावात अंमलबजावणी व्हावी तसेच आदिवासी महिला सरपंचांना पोलिसांकडून झालेल्या जातीवाचक शिवीगाळची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज धुळे जिल्हा दारुबंदी समितीच्यावतीने धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात आले. धुळे जिल्ह्यात दारुबंदी व्हावी म्हणून गेल्या 30 वर्षांपासून लढा दिला जात असून अद्यापही जिल्ह्यात दारुबंदी झालेली नाही. या दारुमुळे अनेक कुटूंबे तर उध्वस्त होत आहेतच शिवाय एक लिटर दारु तयार करण्यासाठी 55 ते 65 लिटर पाणी वापरावे लागत असल्याने दर दिवशी कोट्यवधी लिटर पाण्याची नासाडी होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारुबंदीचे ठराव होवूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने दारुबंदी अशक्य वाटत आहे. शासनाने दारुमुळे मरण पावलेल्या व्यक्तिच्या कुटूंबाला किमान 5 लाखांची मदत द्यावी, व्यसनाधिनांची नोंद घेवून त्याच्यावर उपचारासह मोफत समुपदेशन करावे अशी मागणीही करण्यात आली आहे.
धरणे आंदोलनात यांनी घेतला सहभाग
निकुंभे गावात दारुबंदी केल्यानंतर दारुमाफीयांकडून महिला सरपंचासह समिती सदस्यांनी धमकावण्याचे प्रकार होत असून ग्रामस्थांनी दारुसह पकडून दिलेल्या आरोपींवर कारवाई करण्याऐवजी सोनगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी महिला सरपंचांना धमकाविण्याचे प्रकार करीत आहेत. याची चौकशी होवून कारवाई करावी, अशीही मागणी केली आहेे.एक महिन्याच्या कालावधीत ठराव झालेल्या सर्व गावात शंभर टक्के दारुबंदी अमलात आणली नाही तर गावा गावातील तहसिलदारांना दारुचे ड्रम भेट देवून समिती निषेध नोंदवेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनात समितीचे निमंत्रक नवल ठाकरेंसह मनिषा ठाकरे, अविष्कार मोरे, सिध्दार्थ जाधव, कृष्णाजी ठाकरे, मोतीलाल भील, गेमाजी सैंदव, शाणाभाऊ पाटील, अमरदिप पवार, विशाल बैसाणे, एन. जुनेद आदी सहभागी झाले.