राजकीय दबावातुन घेतला राजीनामा – संजीवकुमार गौतम
जळगाव – जिल्हा दुध संघाचे कार्यकारी संचालक संजीवकुमार गौतम यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती उघड झाली आहे. दरम्यान राजकीय दबावातुन आपल्याकडुन राजीनामा घेतला गेला असल्याची माहिती खुद्द संजीवकुमार गौतम यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली.
जिल्हा दुध संघाच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत दुध संघाचे कार्यकारी संचालक संजीवकुमार गौतम यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. दरम्यान हे राजीनामा प्रकरण वेगळेच असल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यासंदर्भात कार्यकारी संचालक संजीवकुमार गौतम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मे 2019 मध्ये शासनाच्या तांत्रिक समितीमार्फत माझी नियुक्ती झाली होती. नियुक्ती झाल्यापासून जिल्हा दुध संघाच्या हितासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार होत्या. या गोष्टी करतांना अनेकांचे हितसंबंध दुखावले जाणार होते. मार्केटींग आणि खरेदीसंदर्भात अनेक बाबी अशा होत्या ज्यांना मी पायबंद घातला. त्यामुळेच काही जणांना ते सहन झाले नाही. मागील संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षांच्या परवानगीने मी हे विषय मांडले. संचालक मंडळाने त्याचे समर्थनही केले. मात्र नंतरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अचानकपणे अध्यक्षांनी माझा राजीनामा मागितला. तसेच राजीनामा दिला नाही तर टर्मिनेट केले जाईल असे सांगण्यात आले. कुठल्याही स्वरूपाची कारणे दाखवा नोटीस न बजावता राजकीय दबावातुन माझा राजीनामा घेतला गेल्याचे संजीवकुमार गौतम यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना सांगितले.
कौटूंबिक कारणातूनच त्यांचा राजीनामा – खडसे
जिल्हा दुध संघाचे कार्यकारी संचालक संजीवकुमार गौतम यांनी कौटुंबिक कारणातुनच राजीनामा दिला आहे. त्यामागे असे कुठलेही वेगळे कारण नाही. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना काम करणे शक्य नसल्यानेच त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली.