जिल्हा नियोजनासाठी राष्ट्रवादीला भाजपाचा पाठिंबा

0

पुणे । जिल्हा नियोजन समिती निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून येत्या 18 सप्टेंबरला मतदान होणार आहे. ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातील म्हणजेच जिल्हा परिषदेचे 75 मतदार असून त्यातून 17 जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यातील 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर महिला सर्वसाधारण गटातून 5 जागांसाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र निवडणुकीपूर्वीच भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याची तर काँग्रेसने अपक्ष उमेदवार रेखा बांदल यांना पाठिंबा दिल्याची चर्चा दिवसभर जिल्हा परिषद वर्तुळात होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला जंगम यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने त्याचाही फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे पाचवी जागा शिवसेनेला मिळणार की, अपक्ष सदस्यांना मिळणार याबाबतची चर्चा जोरदार रंगली आहे.

येत्या 18 सप्टेंबरला मतदान
पाच जागांसाठी सात उमेदवार सर्वसाधारण महिलांच्या पाच जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. या जागांसाठी येत्या सोमवारी निवडणुका होणार आहेत. यामध्ये शिवसेनेच्या ज्योती झेंडे, शलाका कुलदीप कोंडे, अपक्ष म्हणून रेखा मंगलदास बांदल, राष्ट्रवादीच्या स्वाती पाचुंदकर, अनिता इंगळे, अर्चना कामठे आणि वैशाली पाटील या निवडणूक रिंगणात आहेत़.