कडूस । पुणे जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून खेड तालुक्यातील दिलीप सावित्रू मेदगे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी विशेष निमंत्रित असलेले अतुल महादेव देशमुख यांची जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झाले होते.
राज्य सरकारच्या नियोजन विभागाचे अप्पर सचिव ने. प्र. मानकामे यांनी या संदर्भातला आदेश दिलेला आहे. मेदगे यांनी बेरोजगार अभियंत्यांसाठी विशेष काम केलेले आहे. त्यांची संघटना स्थापन करून बेरोजगार अभियंत्यांना सरकारी कामे देण्याचा निर्णय सरकारकडून करून घेतलेला होता. मेदगे हे पश्चिम पट्ट्यातील कुडे बुद्रुक या गावचे रहिवासी असून जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांनी देशमुख यांच्या विजयात मोलाची कामगिरी निभावली होती. मेदगे हे पालकमंत्री गिरीश बापट यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने व त्यांची डीपीडीसी वर दुसरी टर्म असल्याने त्यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. त्यांच्या रुपाने तालुक्यात नवीन सत्ताकेंद्र उदयास आले आहे. सध्या ते पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष या पदावर कार्यरत असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे.