भाजपचे सात तर राष्ट्रवादीच्या तिघांना मिळाली संधी
पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा नियोजन समितीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 10 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामध्ये भाजपचे सात तर राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या आठ आणि राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरले होते. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी होती. यामध्ये भाजपचे नामदेव ढाके, राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर, प्रज्ञा खानोलकर यांनी माघार घेतली. त्यामुळे सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका जयश्री गावडे, माई ढोरे, आरती चोंधे, नितीन लांडगे, शत्रुघ्न काटे यांची तर राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, श्याम लांडे आणि नगरसेविका उषा वाघेरे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
पुणे महापालिकेतून 28 अर्ज
आमदार व खासदार यांचा निधीही जिल्हा नियोजन समितीच्या अधिकारामध्येच खर्च करण्यात येतो. समितीचे अध्यक्ष पालकमंत्री तर सचिवपदी जिल्हाधिकारी असतात. जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे केंद्र व राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यात येते. पुणे महापालिकेतील 28 नगरसेवकांनी सदस्यत्त्वासाठी अर्ज भरले होते. 211 सदस्यांत 11 महिला, सहा इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आणि तीन अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव होत्या. यामध्ये शिवसेनेच्या पल्लवी जावळे, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे दीपक पोटे, वीरसेन जगताप, राजाभाऊ लायगुडे, वृषाली चौधरी, मनीषा कदम, स्वप्नाली सायकर यांची तर राष्ट्रवादीचे सचिन दोडके, सुमन पठारे, अमृता बाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे.