पुणेः जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीसाठी नामनिर्देशनपत्र 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान सादर करता येणार असून जिल्ह्यातील 40 जागांसाठी येत्या 18 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते पाच दरम्यान मतदान होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी लागणार आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवारी द़ि 29 ऑगस्टला केली जाणार आहे. नामनिर्देशन पत्र फेटाळले गेल्यास जिल्हाधिका-यांकडे 1 सप्टेंबरपर्यंत अपिल करता येणार असून अपीलावर 5 सप्टेंबरपर्यंत निर्णय देण्यात येणार आहे.अपिलांवरील निर्णयानंतर नामनिर्देशन पत्रांची यादी 7 सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांना त्यांच्या उमेदवारी अर्ज 8 सप्टेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करता येणार आहे. निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रत्यक्ष मतदान दिलेल्या मतदान केंद्रावर 18 सप्टेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी 19 सप्टेंबरला सकाळी 11पासून विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. जिल्हा नियोजन समितीचे 40 सदस्य जिल्हा परिषद, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेच्या नगरसेवक, नगरपालिकेच्या नगरसेवकांमधून निवडले जातात. सदस्यपदासाठी दरवेळी मोठ्या प्रमाणात चुरस असते.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून तसेच पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेमध्येही भाजपची सत्ता आली आहे. तसेच काही नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्येही भाजपची ताकद काही प्रमाणात वाढली आहे़ त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. यंदा राष्ट्रवादीला भाजपचे कडवे आव्हान उभे राहणार असल्याची चिन्हे आहेत.