जिल्हा पत्रकार संघातर्फे बुधवारी जनसंवाद कार्यक्रम

0

जळगाव। जळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने बुधवारी 5 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचा जनसंवाद हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा पत्रकार संघाच्या पद्मश्री डॉ. भवरलाल जैन सभागृहात होईल. निंबाळकर हे जळगाव जिल्ह्याचे 38 वे जिल्हाधिकारी असून पहिल्यांदा नागरिकांच्या सोबत प्रश्नोत्तराचा जनसंवाद कार्यक्रम होत आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध 70 प्रश्नांची यादी नागरिकांकडून गोळा करण्यात आली असून त्याचे उत्तर या जनसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासन देणार आहे. या शिवाय, जिल्ह्यात इतर कोणते विकास प्रकल्प राबविता येतील याची माहिती श्री. निंबाळकर देतील.

जळगाव जिल्ह्यातील सर्व दैनिकांचे प्रतिनिधीही नागरिकांच्या जिव्हाळ्याचा एक-एक प्रश्न विचारणार आहेत. नागरिकांकडून आलेले प्रश्न त्या त्या मान्यवरास थेट विचारता येतील. अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.