जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक

0

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांची निवडणूक उद्या म्हणजेच मंगळवारी होत असून भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली असली तरी सिंधुदूर्गमध्ये मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना शह देण्यासाठी शिवसेना भाजपाबरोबर सूत जुळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जाते.

जिल्हा परिषदांसाठी झालेल्या मतदानात सर्वच जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला चांगलेच यश मिळाले. मात्र, जवळजवळ आठ जिल्हा परिषदांमध्ये सर्वात जास्त सदस्य असूनही ते स्वबळावर अध्यक्ष निवडून आणू शकत नाही. त्यामुळे भाजपाने शिवसेनेबरोबर जुळवून घेण्याचे प्रयत्न केले होते. पण, या निवडणुकीत भाजपाबरोबर निर्माण झालेले वितुष्ट आणि भाजपाचा चढता आलेख पाहून धास्तावलेल्या शिवसेनेने भाजपाला प्रतिसाद दिला नाही. याऊलट, भाजपाला ग्रामीण भागात रूजण्यास मदत होऊ नये म्हणून सेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपाला जालना, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा व यवतमाळ, या आठ जिल्हा परिषदेत अध्यक्षपदापासून वंचित राहवे लागण्याची शक्यता आहे. या युतीमुळे शिवसेनेला एका जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळेल तर इतर सात ठिकाणी शिवसेनेला भाजपाला सत्तेपासून दूर ठेवल्याचे समाधान मिळेल. मात्र, उस्मानाबाद, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सांगली आणि बीड या जिल्ह्यात स्थानिक समीकरणे जुळत नसल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तीव्र मतभेद आहेत. त्याचा फायदा घेत भाजपाही शक्य त्या सर्व माध्यमातून प्रयत्न करून आपला अध्यक्ष निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळते.

नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर व अशोक चव्हाण यांच्यातले मतभेद उफाळून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसशी युती करण्यास चिखलीकरांनी नकार दिल्याचे बोलले जाते. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व स्थानिक काँग्रेस नेते, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यात टोकाचे वाद आहेत. उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड आणि राष्ट्रवादीत वाद आहेत. शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत आणि खासदार रवी गायकवाड यांच्यात तीव्र मतभेद आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार की भाजपासोबत, हे कोडे आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपाचे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन व दादा भुसे यांच्यात वाद आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीत दुफळी आहे. पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीसाठी आग्रही मागणी केली आहे. बीडमध्ये नव्याने शिवसेनेत आलेले माजी आमदार बदामराव पंडित यांचा धनंजय मुंडे यांच्यासोबत जाण्यास तीव्र विरोध आहे. सांगलीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे पतंगराव कदम यांच्याबरोबर सेनेचे आमदार अनिल बाबर यांचा वाद आहे.

वर्धा, लातूर, चंद्रपूर व जळगाव जिल्हा परिषदेत भाजपा स्वबळावर अध्यक्ष निवडून आणू शकते. बीडमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश धस यांचे सात समर्थक भाजपाकडे चालल्याने बीडमध्ये आपले बंधू धनंजय, यांच्यावर मात करण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. रायगड जिल्हा परिषदेत सेतकरी कामगार पक्षाकडे जास्त सदस्य असतानाही शेकापने तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून निवडून येऊ शकतील. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत कोण बाजी मारमार, याचीी चर्चा सुरू असतानाच गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेचे दोन सदस्य गायब असल्याने तेथे एकच खळबळ उडाल्याचे वृत्त आहे.