मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाच्या गांधी भवन, या कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर चव्हाण यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषदेत आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसशी संपर्क साधला आहे. २५ पैकी बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.
मुंबई महानगरपालिकेतील त्रिशंकू परिस्थितीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना व भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष असून केंद्रात व राज्यात ते एकत्रितपणे सरकार चालवत आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना व भाजपाकडे बहुमताइतके संख्याबळ आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपाने मिळून सत्ता स्थापन करायची की नाही, हा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. या संदर्भात काँग्रेसची भूमिका त्रयस्थाची असून काँग्रेस या परिस्थितीकडे ‘वेट अँड वॉच’नुसार केवळ ‘वॉच’ करीत आहे.
या बैठकीला अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, हुसेन दलवाई, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस आदी नेते उपस्थित होते.