धुळे। धुळे जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 आणि वर्ग-4 च्या कर्मचार्यांची बदली प्रक्रियेसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत होती. ही बदली प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकार्यांनीही दक्षता घेतली असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन पध्दतीने बदली प्रक्रिया राबविण्यासाठी कार्यवाही करण्यात आली. मे महिना अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून कर्मचार्यांना निवासासह पाल्यांच्या शैक्षणिक सुविधेच्या दृष्टिने ते योग्य ठरणार आहे. जिल्हा परिषदेत पारदर्शीपणे प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कर्मचार्यांमधून समाधान
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी के.एच.राऊत, अतिरिक्त आरोग्य अधिकारी बी.जी.चव्हाण, उपमुख्य लेखा अधिकारी प्रविण देवरे यांच्या उपस्थितीत बदली संदर्भातील मत जाणून घेण्यात आले. यावेळी बदली का हवी? याचे ठोस कारण कर्मचार्यांना द्यावे लागले त्यामुळे बदलीचे कारण आणि बदलीची जागा याबाबत वरिष्ठांना निर्णय घेणे सोपे जाणार आहे. प्रथमच धुळे जिल्हा परिषदेत अशा प्रकारची बदली प्रक्रिया राबविली जात असल्याने कर्मचार्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
विविध विभागांचा समावेश
अर्थविभाग, महिला व बालकल्याण विभाग, सामान्य प्रशासन वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचार्यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. यात केटर, सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक परिचर, कनिष्ठ सहाय्यक परिचर यांचा समावेश होता. यात सहाय्यक प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या 10,कनिष्ठ प्रशासन अधिकारी 20, वि.अं. सांखिकी 13, वरिष्ठ सहाय्यक लिपीक 82, कनिष्ठ सहाय्यक लिपीक 190 तर परिचर 423 कर्मचार्यांचा यात समावेश होता. त्यात विनंती बदलीस पात्र कर्मचार्यांची संख्या ही 39 होती. या सर्व कर्मचार्यांचे म्हणणे आगामी तीन दिवसात ऐकूण घेतले जाणार असून त्यानंतर बदलीचे अंतीम आदेश काढले जाणार आहेत.