जळगाव । जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर जिल्ह्याचे लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडे लागले होते. भाजपाने जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळविली आहे. शनिवारी सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. चारही सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. भाजपाच्या तीन तर कॉग्रेसच्या एका सदस्यांची निवड सभापतीपदासाठी करण्यात आली. महिला व बालविकास समिती सभापतीपदी रजनी चव्हाण यांची तर समाजकल्याण सभापतीपदी प्रभाकर सोनवणे यांची वर्णी लागली. विषय समिती क्रमांक 1 च्या सभापतीपदी कॉग्रेसचे दिलीप पाटील यांची तर विषय क्रमांक 2 च्या सभापतीपदी पोपट भोळे यांची बिनविरोध निवड झाली. भाजपाने प्रादेशिक समतोल राखत उमेदवार दिले. कॉग्रेसने भाजपाला अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरीता बिनशर्त पाठींबा दिल्याने कॉग्रेसच्या एका सदस्याला सभापतीपद देण्यात आले. पिठासीन अधिकारी म्हणून जलज शर्मा यांनी काम पाहिले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, राजन पाटील उपस्थित होते.
कॉग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी
कॉग्रेसचे आर.जी.पाटील हे भाजपाला पाठींबा देण्याकरीता सुरुवातीपासून अनुकुल होते. शेवटी अध्यक्ष निवडीत कॉग्रेसच्या चारही सदस्यांनी भाजपाला पाठींबा दिला. आर.जी.पाटील यांच्या पत्नी अरुणा पाटील यांना सभापतीपद दिले जाणार हे शेवटच्या दिवसापर्यत जाहीर असतांना अर्ज दाखल करतांना दिलीप पाटील यांचे नाव समोर आल्याने अरुणा पाटील यांनी अर्ज दाखल केला नाही. अरुणा पाटील यांनी माघार घेतल्याने दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे कॉग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा दिसून आले.
सेना, राष्ट्रवादींचा बहिष्कार
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीप्रसंगी कॉग्रेसने भाजपाला पाठींबा दिल्याने भाजपाला जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत शिवसेना राष्ट्रवादीने तर कॉग्रेस भाजपाने युती केल्याचे दिसून आले. सभापती निवडीवर शिवसेना व राष्ट्रवादीने बहिष्कार टाकणार असल्याचेे एक दिवस अगोदर जाहीर केले होते. अखेर त्यांनी बहिष्कार टाकला. शिवसेनेचे तीन सदस्य बहिष्कार नोंदविण्यासाठी सभागृहात हजर होते. यात पाळधीचे प्रताप पाटील, पवन सोनवणे, दिलीप चौधरी यांचा समावेश होता.
सभागृहात 42 सदस्य
जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 67 आहे. भाजपाचे 33, राष्ट्रवादी कॉग्रेसचे 16, शिवसेनेचे 14, कॉग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपदाच्या निवडीप्रसंगी 42 सदस्य उपस्थित होते. भाजपाचे 33, कॉग्रेसचे 4, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 2, पंचायत समितीचे 15 पैकी 10 सदस्य उपस्थित होते.
भाजप विरोधात एकही अर्ज नाही
जिल्हा परिषदेत भाजपाचे 33 सदस्य आहेत. सभापतीपदाकरीता सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत होती. दुपारी 12.30 वाजेपर्यत एकही अर्ज घेण्यात तसेच भरण्यात आले नव्हते. 12.35 मिनीटांनी भाजपातर्फे पहिला अर्ज घेण्यात आला. भाजपाने सभापतीपदाकरीता तीन उमेदवार दिले होते. त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाही.
कॉग्रेसच्या कोणत्या सदस्याला सभापतीपद द्यावे यावरुन पक्षात थोड्याप्रमाणात वाद होता. नाथाभाऊ हे आर.जी.पाटील यांच्या पत्नी अरुणा पाटील यांच्याकरीता आग्रही होते. परंतु कॉग्रेस नेत्यांनी दिलीप पाटील यांचे नाव सुचविल्याने त्यांच्या नावाने व्हीप जारी करण्यात आला .
-ना.गिरीश महाजन