शासनाने केलेल्या सर्वेक्षणात शंभरपैकी 82 गुण : औरंगाबाद विभागालाही समान गुण
पुणे : कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, पीपीआययूसीडी, गरोदर माता नोंदणी, लसीकरण यासह अन्य आरोग्य सेवांमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बाजी मारत’ राज्यात प्रथम क्रमांकाचा मान पटकविला आहे. राज्य शासनाने केलेल्या या सर्व्हेक्षणात आरोग्य विभागाला शंभरपैकी 82 गुण मिळाले आहेत. राज्यातील आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने सुरू रहावी, सेवा देताना रुग्णांना तत्काळ आणि उत्तम सेवा मिळावी, यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रँकिंग काढले जाते. त्यामध्ये प्रत्येक विभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे, नोंदणी, साथीरोगांवर कसे नियंत्रण आणले या सर्व बाबींची पाहणी केली जाते. त्यानुसार प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्र गुण देण्यात येतात. त्यानुसार जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे.
आरोग्यसेवेची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षण
ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविण्याचे काम हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असते. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या साह्याने तसेच आरोग्यसेवकांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. या आरोग्यसेवेची पाहणी करण्यासाठी तसेच राज्यातील आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीने सुरू राहावी आणि रुग्णांना सेवा देताना तत्काळ व उत्तम सेवा मिळते की नाही, हे पाहण्यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रँकिंग काढण्यात येते. यामध्ये प्रत्येक विभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे, रुग्णांची नोंदणी, साथीच्या रोगांवर कशा पद्धतीने नियंत्रण आणले, तत्काळ आरोग्यसेवा या सर्व गोष्टींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र गुण दिले जातात. या सर्वेक्षणात पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा अव्वल ठरला. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, पीपीआययूसीडी, गरोदर माता नोंदणी, लसीकरण यांसह अन्य आरोग्यसेवा चांगल्या दिल्याने त्यांना या सर्वेक्षणात 82 गुण मिळाले.
लसीकरणाचे कार्य उत्तम
जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपक्रेंद्रातील सेवेला शिस्त लावून आवश्यक त्या नोंदणी तत्काळ करून घेतल्या. यामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गरोदर मातांची नोंदणी आणि वेळोवेळी पाठपुरावा करणे, लसीकरणात उत्तम काम केले आहे. तसेच स्वाइन फ्लू साथीदरम्यान आरोग्य विभागाने चांगले काम केल्याने सर्वाधिक गुण देण्यात आले. यामध्ये पुणे आणि औरंगाबाद विभागाला समान गुण असून, या दोन्ही जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाने प्रथम क्रमांक पटकविला आहे.
रुग्णाला चांगली सेवा देण्याचे प्रयत्न
आमच्या आरोग्य विभागाला मिळालेला प्रथम क्रमांक हा अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्यांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे. त्यामध्ये अध्यक्ष विश्वास देवकाते, सीईओ सूरज मांढरे आणि आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांचे मार्गदर्शन मिळाले. हा क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रत्येक रुग्णाला उत्तमोत्तम सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डॉ. दिलीप माने, आरोग्य प्रमुख, जिल्हा परिषद, पुणे