जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्य निवडीत घोळ; शासकीय नियम धाब्यावर

0

जळगाव। जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांची निवड ही वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. मंगळवारी पहिली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत विषय समिती सदस्य निवडीचा ठराव मांडण्यात आला. चारही गटनेत्यांनी विषय समिती सदस्य निवडीचा अधिकारी एकमताने जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना दिले. सदस्यपदासाठी 124 अर्ज घेण्यात आले. मात्र सभेत कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आली नाही. सर्वसाधारण सभेत नावे जाहिर करणे अपेक्षीत असतांना ते केले गेले नाही. त्यामुळे आता सदस्यांच्या नावाची घोषणा ही अध्यक्ष पुढील सभेत होण्याची शक्यता आहे.

एकही अर्ज दाखल नाहीः जिल्हा परिषदेच्या या पंचवार्षीकची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी 18 रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहु महाराज सभागृहात पार पडली. बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने सभेत एकही विषय नव्हते. एकमेव विषय समिती सदस्य निवडीचा विषय या सभेच्या अजेंड्यात होता. 76 विषय समिती सदस्यपदासाठी सकाळी 9 ते 11 वाजे दरम्यान एकुण 124 अर्ज वितरीत करण्यात आले. अर्ज दाखल करण्याची मुदत 1 वाजेपर्यत होती मात्र विहीत मुदतीत एकही अर्ज प्रशासनाकडे आले नाही. 20 मिनीटातच सभा आटोपण्यात आली. विषय समिती सदस्य निवडीचा विषय असतांना एकही सदस्यांच्या नावाची घोषणा सभेत करण्यात आले नसल्याने विषय समिती सदस्य निवडीत घोळ असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या चारही गटाच्या गटनेत्यांनी संमतीने सदस्य निवडीचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षाला बहाल केले. सर्वसाधारण सभेत सदस्य निवड करणे हे शासकीय नियम असतांना सर्व नियम धाब्यावर बसवुन सभेत सदस्य निवड करण्यात आली नाही.
स्वकीयांसह विरोधक नाराज ः जिल्हा परिषदेत एकुण दहा विषय समिती असतात. या सर्व विषय समितीत सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांना समावून घेण्यात येते. समिती सदस्यांची निवड हे सर्वसाधारण सभेतच होत असते. मात्र यावेळी एकही सदस्यांची नावे सभेत जारी करण्यात आले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली.

अध्यक्ष निवासस्थानी ‘लंच डिप्लोमसी’: पहिली सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेत घेण्यात आली. त्या अगोदर सर्व जिल्हा परिषद सदस्यांसाठी अध्यक्ष निवासस्थानी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व जिल्हा परिषद सदस्यांना भोजनासाठी आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी अध्यक्ष निवासस्थानी भोजन घेणे टाळले. अध्यक्ष निवासस्थानी विषय समिती सदस्यपदाच्या निवडी अगोदर सर्व सदस्यांना खुष करण्यासाठी लंच डिप्लोमसी करण्यात आल्याचे दिसते.

भाजपा सदस्यांची कोर्‍या अर्जावर सही
विषय समिती सदस्यपदाची निवड पहिल्या सर्वसाधारण सभेत होत असते. मुदतीत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची सुचना देण्यात आली होती. दहा विषय समिती सदस्यपदी सर्व झेडपी सदस्यांना सामावुन घेण्यात येत असते. भाजपाच्या 33 सदस्य जिल्हा परिषदेत निवडुन आले आहे. त्यापैकी 5 पदाधिकारी असुन उर्वरीत 28 सदस्यांना समितीत सामावुन घेण्यात येणार आहे. भाजपाच्या सर्व सदस्यांची पक्ष कार्यालयात कोर्‍या अर्जावर स्वाक्षरी घेण्यात आल्या त्यामुळे कोणत्या सदस्यांची कोणत्या समितीत निवड झाली. हा प्रश्‍न सर्वांमध्ये उपस्थित होत आहे.