जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक बोगस अपंग शिक्षक

0

पुणे । जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अपंग असल्याचे खोटे पुरावे सादर करून नोकरी करणार्‍या बोगस शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांची माहिती देण्यास शिक्षण विभाग टाळाटाळ करत आहे, असा आरोप प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने केला आहे.जिल्हा परिषदेच्या अपंगांच्या कोट्यातून कार्यरत असणार्‍या बोगस शिक्षकांवर कारवाई करावी. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धमेंद्र सातव यांनी दिला आहे. अपंग शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेच्याकडे पाच महिन्यांपासून मागितली आहे, ती अद्याप दिली नाही. अपंग कोट्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बहुसंख्य बोगस व्यक्ती कार्यरत आहेत. काहींनी अपंग कोट्यातून नोकरी मिळविली आहे, तर काहींनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे़ यामुळे खर्‍या गरजू अपंगांवर अन्याय होत असून अपंग हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे.

गट शिक्षणाधिकार्‍यांना माहिती देण्याची सूचना
याबाबत संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना 22 मे 2017 रोजी निवेदन देण्यात आले असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणा-या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या अपंग कोट्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिपाई आणि लिपिकांची माहिती द्यावी, असे म्हटले होते. त्यानंतर 10 नोव्हेंबरला शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये असणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांना तीन दिवसांमध्ये अपंग कोट्यातून कार्यरत असणार्‍यांची माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही माहिती उपलब्ध झालेली नाही.

बोगस अपंगांना तत्काळ बडतर्फ करा
जिल्ह्यात बोगस शिक्षक असणे हा अपंगांवर मोठा अन्याय आहे़ अपंगांच्या हक्कांवर घाला घालणार्‍या बोगस अपंगांना तत्काळ बडतर्फ करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच त्यांना मदत करणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाई करण्यात यावी.
– धमेंद्र सातव,
पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन