जळगाव । मिनी विधानसभा संबोधल्या जाणार्या जिल्हा परिषदेची निवडणुक रणधुमाळी अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीनंतर थंड झालेली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता विविध विषय समितीच्या सभापतीच्या निवडीकडे संपर्णु जिल्ह्याचे लक्ष लागुन आहे. विषय समिती सभापतीपद हा अत्यंत मानाचा समजला जातो. अध्यक्ष उपाध्यक्षानंतर सभापतीपदाला दर्जा असतो. दरम्यान 21 मार्च रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड पार पडली. 1 एप्रिल रोजी विषय समिती सभापती पदाची निवड होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याने सर्वाधिक जागा या पक्षाच्या निवडुन आल्या. भाजपातर्फे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाकरीता अनेकांचे नावे चर्चेत होती. ज्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली नसल्याने इच्छुकांची नाराजी झाली आहे. नाराज असलेल्यांना सभापती पदाची संधी देऊन नाराजी दुर करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. सभापती पदाकरीता इच्छुकांनी त्यांच्यापरीने राजकीय फिल्डींग लावली असून कोणाला संधी मिळणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.
कॉग्रेसला एका पदाची संधी जिल्हा परिषदेत भाजपाचे सर्वाधिक 33 सदस्य निवडुन आल्याने सत्ता स्थापनेसाठी केवळ एका जागेची आवश्यकता होती. भाजप कोणाच्या मदतीने सत्ता स्थापन करणार याविषयी वेगवेगळ तर्कविर्तक लावले जात होते. मात्र प्रत्यक्ष कॉग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपाकडून मतदान केल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही भाजपचे झाले. कॉग्रेसने बिनशर्त पाठींबा दिला असला तरी कॉग्रेसला एक सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. आर.जी.पाटील हे सुरुवाती पासूनच भाजपाला मदत करण्यासाठी अनुकुल दिसून येत होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी अरुणा पाटील यांना सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. कॉग्रेसला एक सभापतीपद मिळू शकेल अशी घोषणा खुद्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
कोणाला मिळणार झुकते माप
दहा विषय समिती असल्याने दहा सभापतीपद असणार आहे. कॉग्रेसने भाजपाला बिनशर्त पाठींबा दिल्याने कॉग्रेसच्या एका सदस्याला सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा भाजपाने स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली आहे. यावेळी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी बिनशर्त पाठींबा मिळाला असल्याने सर्व पदाचा प्रबळ दावेदार भाजपाचेच सदस्य असणार आहे. सभापतीपदाकरीता भाजपाकडून अनेक सदस्य इच्छुक असून कोणाला झुकते माप दिले जाते याकडे लक्ष लागुन आहे.
समान संधी देण्याचा प्रयत्न
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात खडसे व महाजन हे दोन वेगवेगळे गट असल्याचे सर्वश्रृत आहे. काही दिवसांपुर्वी दोन्ही गटात शाब्दिक चकमक देखील दिसून आली. मागील पंचवार्षीमध्ये दोन्ही अध्यक्षपद महाजन गटातील सदस्यांना मिळाले होते. या वर्षी खडसे गटाकडे अध्यक्षपद जाणार हे निश्चित होते. तसेच झाले अध्यक्ष हा खडसे गटाचाच झाला. आता सभापदाकरीता दोन्ही गटातील सदस्यांना समसमाधन संधी देण्याचा प्रयत्न भाजपाचा असणार आहे.