जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातर्फे बाह्य रुग्ण विभाग

0

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांतर्फे उद्घाटन ; सर्दी, ताप यासह रक्तदाब, मधुमेहाचे केले जाणार निदान व उपचार

जळगाव : जिल्हा परिषदेचे कर्मचारी तसेच पदाधिकार्‍यांना आरोग्य सेवा देण्यासाठी जि.प.मध्ये आरोग्य विभागाच्यावतीने बाह्यरुग्ण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. बाह्यरुग्ण विभाग असलेली जळगाव जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्यातील आठव्या क्रमांकाची जि.प.ठरली आहे.

जि.प.मधील अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकार्‍यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पुढाकार घेत जि.प.च्या इमारतीतच बाह्यरुग्ण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, आयुर्वेदीक विस्तार अधिकारी डॉ. मनोहर बावणे, साथरोग अधिकारी डॉ. वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद चौधरी, कक्ष अधिकारी प्रतिभा सुर्वे, सांख्यिकी अधिकारी वाणी, कार्यालयीन अधीक्षक नूतन तासखेडकर, विस्तार अधिकारी विद्या पाटील, विद्या राजपूत, विजय कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक किशोर पाटील, नीलेश पाटील, औषध निर्माण अधिकारी सुरेश मराठे, खडके, आरोग्य सहाय्यक बी.टी. सूर्यवंशी, आरोग्य सेविका विजया पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

असा असेल बाह्यरुग्ण विभाग
या बाह्यरुग्ण कक्षात एक डॉक्टर, एक औषध निर्माण अधिकारी, एक आरोग्य सेविका कार्यरत राहणार आहे. या ठिकाणी सर्दी, खोकला, ताप, उलटी, जुलाब यासह रक्तदाब, मधुमेहाचे निदान व उपचार केले जाणार आहेत.

अधिकारी, पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्याला यश
बाह्य रुग्ण कक्षासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, माता-बाल संगोपन अधिकारी समाधान वाघ यांनी पाठपुरावा केला. जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी स्थायी समितीच्या सभेत या बाह्य रुग्ण कक्षाचा विषय मांडला होता.