जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कठीण !

0

संख्याबळ पाहता भाजपला बहुमताची चिंता नाही

शिवसेना आणि राष्ट्रवादीला कॉंग्रेसचे असहकार; अडीच वर्षापूर्वीचा ‘पॅटर्न’ कायम

जळगाव: राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीची खेळी यशस्वी ठरली आहे. राज्याचा कारभार आता महाविकास आघाडी सांभाळणार आहे. महाविकास आघाडीमुळे अनेक ठिकाणी स्थानिक राजकारणात बदल घडणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्ता बदलत करण्यात यशस्वी ठरली, त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेत देखील महाविकास आघाडीचे समीकरण जुळून येईल आणि सत्ता बदल होईल असे म्हटले जात आहे. परंतु भाजपकडे असलेले संख्याबळ आणि कॉंग्रेसने अडीच वर्षापूर्वीच भाजपला दिलेला ‘हात’ यामुळे महाविकास आघाडीला जिल्हा परिषदेतील सत्ता बदलात यश येईल का? याबाबत शंका आहे. राज्याच्या धर्तीवर जि.प.मध्ये आघाडी यशस्वी करण्याच्या हालचाली शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सुरु आहे, मात्र त्याला कॉंग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणार नसल्याचे दिसते. कारण अडीच वर्षापूर्वी कॉंग्रेसने भाजपला पाठींबा देऊन एक सभापतीपद मिळविले. पुढे देखील हाच पॅटर्न कायम राहील याबाबत जि.प.कॉंग्रेसकडून दुजोरा मिळत आहे.  

शिवसेना, राष्ट्रवादीला विश्वास

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यंदाही अध्यक्ष पद महिला राखीव असल्याने त्यावर कोणाची वर्णी लागेल? याबाबत चाचपणी सुरु आहे. त्यातच राज्यातील सत्ता समीकरण बदलल्याने त्याचा परिणाम जळगाव जि.प.वर होईल असा कयास लावला जातो आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचे सदस्य विश्वास व्यक्त करून सत्ता बदलाचा दावा करत आहे. मात्र प्रत्यक्ष संख्याबळ बघितले तर ते कितपत शक्य होईल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

असे आहे समीकरण  

जि.प.तील भाजपचे स्वबळावरील बहुमत केवळ एका जागेने हुकले. बहुमतासाठी ३४ जागांची आवश्यकता असताना भाजपकडे ३३ जागा आहे. कॉंग्रेसच्या ४ सदस्यांनी पाठींबा दिल्याने भाजप सत्तेत आले. भाजप आणि कॉंग्रेस मिळून संख्याबळ ३७ आहे तर शिवसेनेच्या हतनूर-तळवेल गटातील जि.प.सदस्या सुरेखा कोळी आणि राष्ट्रवादीचे वाघोदा गटाचे जि.प.सदस्य आत्मराम कोळी अपात्र ठरल्याने दोन्ही पक्षाचे संख्याबळ ३० वरून २८ वर आले आहे. निवडणुकीत सेनेचे १४ तर राष्ट्रवादीचे १६ सदस्य निवडून आले होते. आता एक-एक सदस्य अपात्र ठरल्याने सेना १३ तर राष्ट्रवादी १५ वर येऊन ठेपली आहे. कॉंग्रेसने शिवसेना, राष्ट्रवादीला पाठींबा देण्याचे ठरविले तरी संख्याबळ ३२ होते, त्यामुळे बहुमत गाठणे तिन्ही पक्षाला अवघड होणार आहे.  

भाजप अंतर्गत नाराजी?

जि.प.मध्ये भाजपात नेहमीच दोन गट सक्रीय राहिलेले आहे. अनेकदा दोन्ही गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे. आता आठवड्याभरापूर्वी देखील निधी वाटपावरून अंतर्गत वाद समोर आले होते. मात्र समन्वयाने वाद मिटविण्यात पक्षाला यश आले. आता अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीच्या वेळी भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना होईल असे बोलले जात आहे. मात्र कारवाईच्या भीतीने भाजपचे सदस्य व्हीप झुगारणार नाही.