जळगाव: ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही प्रश्न निकाली निघाला नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने आज मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी असहकार आंदोलनाची हाक देत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी यात सहभाग नोंदविला. यावेळी ग्रामसेवकांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणले. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती होणे, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवकांसाठी शैक्षणिक अर्हता बदलून पदवीधर ग्रामसेवक नेमणुका कराव्यात आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे.
यापूर्वी ग्रामसेवकानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्याबाबत निवेदन दिले होते. तत्काळ मागण्या मान्य कराव्या अन्यथा असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. अखेर मागण्यांबाबत विचार न झाल्याने आज जिल्ह्याभरातील ग्रामसेवकांनी आंदोलन केले.
९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी पंचायत समिती कार्यालयासमोर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आज जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु आहे. यानंतर १६ ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालय, १८ ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या घरासमोर, २० ऑगस्टला सर्व मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव यांचं निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाही तर २२ ऑगस्टपासून राज्यभर कामबंद आंदोलन हाती घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.