जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची काँग्रेस,राष्ट्रवादीशी हातमिळवणी

0

मुंबई : ग्रामीण पातळीवरील सत्तेपासून भाजपला रोखण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या होमपीचवर शिवसेनेने विजय मिळवला, तर छगन भुजबळांच्या नाशिकमध्ये सेनेने झेंडा फडकावला. मात्र शिवसेनेचे इरादे फारसे यशस्वी झाले नाही. 25 पैकी दहा जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांवर भाजपचे कमळ फुलले आहे.

राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या निवडणुका आज पार पडल्या. ग्रामीण पातळीवरील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याची खेळी शिवसेनेने आखली होती. मात्र शिवसेनेची खेळी यशस्वी होऊ शकली नाही. या निवडणुकीत अनेक ठिकाणी शिवसेनेने काँग्रेससोबत तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधले होते. 25 पैकी दहा जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांवर भाजपने बाजी मारली आहे. 6 जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने, 5 जिल्हा परिषदेवर काँग्रेस तर 4 जिल्हा परिषदा शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवून केली. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे यांची निवड झाली आहे. भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे.

दुसरा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ याना बसला आहे. नाशिकमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी चक्क शिवसेना-काँग्रेस आणि माकप अशी आघाडी बघायला मिळाली. शिवेसनेच्या शीतल उदय सांगळे अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित यांची निवड झाली आहे. भुजबळांच्या गडावर सेनेचा झेंडा फडकला आहे. बीड जिल्हा परिषदेवर भाजपने शिवसंग्राम आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगावमध्ये चक्क भाजप-काँग्रेस आणि शिवसेना-राष्ट्रवादी अशी अभद्र युती-आघाडी पाहायला मिळाली. याठिकाणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सरशी झाली आहे. जळगावमध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. भाजपच्या उज्वला पाटील या निवडून आल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजप महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे, तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची निवड झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 6 पैकी 3 जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली आहे नगरमध्ये काँग्रेस तर पुणे आणि सातार्‍यात राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. सिंधुदुर्गात काँग्रेस, रत्नागिरीत शिवसेना तर रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. औरंगाबाद,जालना, हिंगोलीत शिवसेना, परभणी, उस्मानाबादेत राष्ट्रवादी तर नांदेडमध्ये काँग्रेस, गडचिरोली, बुलडाणा, चंद्रपुरात भाजपचा अध्यक्ष, तर अमरावती यवतमाळमध्ये काँग्रेसचं वर्चस्व मिळवलं.

जिल्हा परिषद
भाजप – 10
राष्ट्रवादी – 6
काँग्रेस – 5
शिवसेना – 4

कुठे कोणाची हातमिळवणी

जालना – शिवसेना + राष्ट्रवादी
यवतमाळ -भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी
बीड – भाजप,शिवसेना,शिवसंग्राम,काँग्रेस
गडचिरोली – भाजप राष्ट्रवादी
अमरावती – काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना
बुलढाणा – भाजप राष्ट्रवादी
रायगड – राष्ट्रवादी शेकाप
जळगाव – भाजप काँग्रेस
औरंगाबाद – शिवसेना काँग्रेस
नाशिक – शिवसेना काँग्रेस माकप