जळगाव । मिनी विधानसभा संबोधल्या जाणार्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन होते. अखेर जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोसादा गटातुन निवडुन आलेल्या माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांची वर्णी लागली आहे. मंगळवारी 21 रोजी त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. मतदार संघातील कार्यकर्ते नागरिकांची भेट घेऊन बुधवारी 22 रोजी दुपारी 3 वाजता ते जिल्हा परिषद भवनात आले असता जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचार्यांची त्यांच्या सत्कारा करीता गर्दी केली. तसेच कार्यकर्ते नागरिकांनी त्यांच्या दालना समोर गर्दी केली. सर्वांना वेळ देत अध्यक्षांनी सत्कार स्विकारला. त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने सर्व राजकीय तर्क वितर्काना पुर्ण विराम मिळाला.
सीईओंनी घेतली भेट : नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील व त्यांचे पती मच्छिंद्र पाटील हे जिल्हा परिषद भवनात दाखल झाले. त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. पांण्डेय यांनी अध्यक्षांशी अर्धा तास चर्चा केली. सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी अध्यक्षांची भेट घेत परिचय करुन दिला. सायंकाळी 7 वाजेपर्यत जिल्हा परिषद भवनात स्वागत सत्काराचा ओघ सुरुच होता. बांधकाम विभाग मुख्यकार्यकारी अभियंता, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी देवांग यांनी त्यांची भेट घेतली.