जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घोषीत

0

जळगाव । जिल्ह्यातील 67 जिल्हा परिषद आणि 134 पंचायत समितीसाठी 16 फेबु्रवारी रोजी मतदान घेऊन 23 फेबु्रवारी रोजी निकाल जाहिर करण्यात आला. निवडणुक प्रक्रियेनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 20 मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने 21 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार आहे. तसेच जिल्ह्यातील 15 पंचायत समिती सभापतीची निवड 14 मार्च रोजी होणार आहे. 13 मार्च रोजी पंचायत समितीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक 33 जागा मिळवित भाजप जिल्ह्यातील क्रमांक एकचा, राष्ट्रवादी कॉग्रेस 16 दुसर्‍या तर शिवसेना 14 जागा मिळवित तिसर्‍या क्रमांकावर आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीप्रसंगी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल असणार आहे तर पंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी पिठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी असणार आहे.

अध्यक्ष निवडीकडे लक्ष
मिनी विधानसभा संबोधल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षाचे लक्ष लागुन होते. जिल्हा परिषद अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा असल्याने यासाठी अनेक इच्छुक आहे. जिल्हा परिषद बहुमतासाठी 34 जागेची आवश्यकता असते. भाजपाला 33 जागा मिळाली असून बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता आहे. भाजपा कोणाच्या मदतीने सत्ता स्थापन करणार की कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना तिन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता याकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागून आहे. पक्षांतर्गत बंदी असल्याने फुट पडू शकणार नाही. मात्र सदस्य फुटुन जाणार नाही याची काळजी घेत सर्व पक्षाने गट नोंदणी केली आहे. मागील पंचवार्षीकला जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या तालुक्यातील दोन सदस्यांना अध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. या वर्षी कोणत्या तालुक्याला संधी मिळते याकडे लक्ष आहे.