धुळे (रोगेश जाधव)। केंद्र सरकारकडून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना धुळे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये मात्र जागोजागी अस्वच्छता नांदत असल्याचे चित्र दिसून येत आहे. देशामध्ये स्वच्छता मोहिम मोठया प्रमाणात राबविली जात आहे. यामध्ये प्रत्येक गाव स्वच्छ करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे नेहमी स्वच्छ राहावी, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात असताना जिल्हाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेले जिल्हा परिषद कार्यालय मात्र अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेचे चित्र आहे.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
काही ठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी ठेवल्या आहेत. त्यामध्येही कचरा तसाच असल्याचे दिसून येते. तर जिन्याच्या कोपर्यात गुटखा खाऊन भिंती रंगवल्याचेही चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये बर्याच ठिकाणी गुटख्याने रंगवलेल्या भिंती व कोपरे दिसतात. एकूणच ज्या जिल्हा परिषदेने स्वच्छतेमध्ये राज्यात आपला ठसा उमटवला आहे. त्याच जिल्हा परिषद कार्यालयात जागोजागी दिसणारा कचरा व अस्वच्छता ही खेदाची बाब आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टाकीलगत घाण
जिल्हा परिषद कार्यालयात बर्याच ठिकाणी विटा, मातीचे ढिग पडलेले आहेत. जिल्हयाला स्वच्छतेचे धडे देणार्या जिल्हा परिषदेमध्येच मोठया प्रमाणात अस्वच्छता दिसत असल्याने जिल्हा परिषदेमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मोठया प्रमाणात स्वच्छता मोहिम राबविली आहे. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी, स्वच्छतेसाठी जिल्हाभर वेगवेगळया माध्यमातून प्रबोधनही केले आहे, परंतु खुद्द जिल्हा परिषद आवारातच अस्वच्छता दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये कचराकुंडी आवश्यक आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेमध्येही जागोजागी कचराकुंडी असतानाही काही महाभाग त्यामध्ये गुटखा खाऊन थुंकतात. शिवाय बर्याच महत्तवाच्या ठिकाणी थुंकून अस्वच्छता केली आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. या ठिकाणीसुध्दा मोठया प्रमाणात अस्वच्छता दिसून येते.