भाजपाच्या बैठकीनंतर आता शिवसेनेच्या गटवार बैठका, ४४ ग्रामपंचायतीतील हजारो शिवसैनिकांची उपस्थिती
किन्हवली । किन्हवली परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला लागले आहेत. भाजपच्या बैठकांनंतर शिवसेनेनेही गटवार बैठक घेऊन एकला चलो रे चा नारा देत शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. किन्हवली, मळेगाव व सोगाव जिल्हा परिषदेच्या गटवार बैठका बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या. या साठी अस्नोली, मळेगाव, किन्हवली, मानेखिंड, सोगाव व मांजरे पंचायत समिती गणाच्या ४४ ग्राम पंचायतीतील हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसैनिकांच्या उपस्थितीत बैठक काही दिवसांपूर्वी भाजपने सोगाव गटाची गट बैठक बोलावली होती. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेनेने बुधवारी दुपारी बागराव फार्महाऊस वर बोलाविलेल्या गट बैठकीस शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. चेरवली मठावर झालेल्या किन्हवली व मळेगाव जिल्हा परिषद गटाच्या बैठकीस शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.सर्वच बैठकांत शिवसैनिकांचा स्वबळावर लढायचं असाच सूर शिवसेनेच्या पदाधिकार्यांमध्ये यावेळी दिसून आला.
यांची होती उपस्थिती या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुका प्रमुख मारुती धिर्डे, माजी आमदार दौलत दरोडा, माजी तालुका प्रमुख काशिनाथ तिवरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या बैठकीनंतर शिवसैनिक स्वयंस्फूर्तीने प्रचाराला लागल्याचे जगन धानके यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी विजयाची खात्रीही दिली.