पुणे : रसायनअंशमुक्त (विषमुक्त) शेती उत्पादनासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषद 200 शेतकर्यांना देशी गाय खरेदी व निविष्ठानिर्मितीसाठी 45 हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दोनशे शेतकर्यांना नैसर्गिक सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. या नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी केले.
नैसर्गिक सेंद्रिय शेतीवर कार्यशाळा
नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दोन दिवसीय नैसर्गिक सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर होते. प्रशिक्षणात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ व मुळशी तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. कृषी अधिकारी विजय खेडकर, दत्तात्रेय भालेराव, रश्मी ओव्हाळ, नीलेश बुधवंत, संताजी जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ योगेश यादव, राहुल घाडगे, धनेश पडवळ, विनोद जाधव उपस्थित होते.
सेंद्रिय शेती काळाची गरज
सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने नावीन्यपूर्ण योजना दोन वर्षार्पंसून सुरू करण्यात आली आहे. रासायनिक खते, कीटकनाशके व बुरशीनाशकाच्या अतिवापरापासून शेतकर्यांना परावृत्त करणे, शेती व मातीचे आरोग्य राखून रसायनअंशमुक्त (विषमुक्त) फळ भाजीपाल्याचे उत्पादन करणे हा या योजनेचा उद्देश आहे, असे सुनील खैरनार यांनी सांगितले. या वेळी डॉ. प्रशांत नाईकवडी, खेमनार, डॉ. दत्तात्रेय गावडे, योगेश यादव, गणेश पडवळ, भरत टेमकर यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा कृषी अधिकारी वसंतराव ठेपे, खत विक्रेते सुनील बडेरा, महेश बोराना यांनी समारोपप्रसंगी मार्गदर्शन केले. वसंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. केव्हीकेचे प्रमुख प्रशांत शेटे यांनी आभार मानले.
अनुदान थेट बँकेत
नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रात दोनशे शेतकर्यांना बायोपेस्टीसाइड, जिवामृत, दशामृत आदी निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. देशी गाय खरेदीसाठी व निविष्ठ तयार करण्यासाठी 45 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ते बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे खैरनार यांनी सांगितले.