जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत होणार शाळाप्रवेश

0

जळगाव। उन्हाळी सुट्टीनंतर जिल्ह्यातील शाळा 15 जून नंतर सुरु होणार आहे. शाळा सुरु होण्याअगोदर सर्व तयारी शाळेतर्फे करण्यात येत आहे. शाळा प्रवेशाच्या दिवशी कार्यक्रम घेऊन प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत शालेय प्रवेश सोहळा होणार आहे. शुक्रवारी 9 रोजी शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी अधिकार्‍यांना याविषयी सुचना देण्यात आल्या. यावेळी शिक्षण सभापती पोपट भोळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन, उपशिक्षणाधिकारी, सर्व समिती सदस्य उपस्थित होते. शाळाप्रवेशा अगोदर करावयाच्या तयारी बाबत यावेळी सुचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व शाळा ह्या डिजीटल करण्याचा संकल्प शालेय शिक्षण विभागाने केले असून त्यासाठी 80 टक्के निधी हे बाहेरील देणगीतुन तर 20 टक्के निधी लोकसहभाग तसेच 14 वे वित्त आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे.

सेमी इंग्लिश शाळेसाठी प्रयत्न
जिल्ह्यात जास्तीत जास्त सेमी इंग्लिश शाळा सुरु करण्यासंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली. 1-7 जूलै दरम्यान जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात येणार असून ज्या शाळेत सर्व सुविधा उपलब्ध आहे त्या शाळेत वृक्ष लागवड करुन ते जगविण्याच्या सुचना देण्यात आल्या. वॉल कम्पाऊंट केलेल्या शाळांची प्रगती व वॉल कंपाऊंट न झालेल्या शाळांची प्रगतींचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी शाळांकडून अहवाल पुढील बैठकीत मागविण्यात आले आहे.

30 जून नंतर बदली
शिक्षकांच्या बदलीसाठी फेबु्रवारीमध्ये नवीन शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. नवीन शासननिर्णयानुसारच शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. मात्र या निर्णयात अनेक जाचक अटी असल्याने शिक्षकांनी विरोध केला आहे. शिक्षकांनी बदलीला न्यायालयात आव्हान दिले असून 16 जून पर्यत शिक्षकांच्या बदलीला स्थगिती मिळाली आहे. तसेच शालेय शिक्षण विभागाला 30 जून पर्यत शिक्षक बदली प्रक्रियेला स्थगिती देण्याचे पत्र प्राप्त झाले आहे.