जिल्हा परिषद सदस्यांनी केली डॉक्टरांची कानउघाडणी

0

वरणगाव । येथुन जवळच असलेल्या पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांवर उपचार होत नसून आौषधीदेखील मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांच्याकडे करण्यात आल्याने त्यांनी शुक्रवार, 10 रोजी आरोग्य केंद्रात भेट देऊन पाहणी केली. आलेल्या तक्रारीवरुन येथील कर्मचार्‍यांची कानउघाडणी करीत याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रारदेखील केली.

वैद्यकीय अधिकार्‍यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे
तळवेल येथून चार किमी अंतरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाही तसेच कर्मचारीदेखील मुख्यालयी राहत नसल्याने येथे रुग्णांवर उपचार होत नाहीत. तसेच रुग्णांना औषधीदेखील दिली जात नाही. हा दवाखाना म्हणजे आराम करण्यासाठी म्हणमन स्वत:हून या ठिकाणी नियुक्ती करून घेतली जाते, असा आरोप असून याची प्रचिती काही रुग्णांना येऊन गेली.

रवींद्र पाटील यांनीही केली तक्रार
प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनीदेखील अचानक भेट दिली होती. यावेळीदेखील वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचारी अनुपस्थित होते. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली होती मात्र सदरच्या तक्रारीनंतरदेखील येथे कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही, हे विशेष !

यांनी केली पाहणी
येथील कर्मचारी रूग्णांशी व्यवस्थीत बोलत नसल्याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यामुळे आज दुपारी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, वरणगावचे नगरसेवक गणेश धनगर, तळवेल सरपंच डॉ.सुनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्या जयश्री पाटील, चेतन झोपे, संजय चौधरी, अनिल पाटील, सुधाकर सुरवाडे, उषा सरोदे, मंगेश पाटील आदींनी भेट देवून पाहणी केली असता अनेक त्रुट्या दिसून आल्या तसेच येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची कानउघाडणी केली.