जिल्हा परीषदेचा कनिष्ठ अभियंता व वरीष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव/अमळनेर : स्वच्छ भारत योजने अंतर्गत बांधलेल्या शौचालयाचे बील मंजूर करण्यासाठी अनुक्रमे 20 हजार व 1500 ररुपयांची लाच स्वीकारणार्या अभियंत्यांना जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली. अमळनेर जिल्हा परीषद बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अरुण जगन्नाथ चव्हाण (57, रा.मराठा कॉलनी,अमळनेर ता.अमळनेर) व अमळनेर जिल्हा परीषद बांधकाम विभागातील वरीष्ठ सहाय्यक योगेश बापू बोरसे (42, रा.प्रताप मिल, कंपाऊंड, अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

बिले काढण्यासाठी मागिली लाच
खेडी प्र.अ., ता.अमळनेर येथील 35 वर्षीय तक्रारदाराने स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत शौचालयांचे बांधकाम केले होते. या बांधकामाचे बिले काढण्यासाठी त्याने जिल्हा परीषदेचे अभियंता अरूण जगन्नाथ चव्हाण आणि वरिष्ठ सहाय्यक योगेश बापू बोरसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी बिल देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. यानंतर त्याच्याकडे चव्हाण यांनी बिल काढण्यासाठी 22 एप्रिल रोजी 20 हजार तर बोरसे याने बिल तयार करण्यासाठी पंधराशे रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. आरोपींनी लाच स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा एसीबीचे डीवायएसपी गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निलेश लोधी, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्‍वर धनगर, प्रदीप पोळ यांच्या पथकाने यशस्वी केला.