जिल्हा पोलिस दलाची सर्तकता : अपहरण झालेली मजुराची अल्पवयीन मुलगी अमरावतीला सुखरुप सापडली

0

जळगाव : मुंबईहून मूळगावी अकोला येथे जात असलेल्या मजुराच्या कुटुंबातील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात तरुणाने अपहरण केल्याची घटना १९ मे रोजी घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेची पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी गंभीर दखल घेतली.

व मुलीच्या शोधार्थ भुसावळ ते अमरावती दरम्यान सर्व पोलीस यंत्रणा कामाला लावली होती. जिल्हा पोलिस दलाच्या या सतर्कतेने सदरची अल्पवयीन मुलगी अमरावती जिल्ह्यातील लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुखरुप मिळुन आली आहे.

चारचाकीचे टायर फुटल्याने कुटुंब महामार्गावर होते थांबले 
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने मुंबई , मुलुंड येथील मजुरांचे कुटुंब १९ मे रोजी खाजगी चारचाकी वाहनाने अकोला जिल्ह्यातील सिसामासा या मुळ गावी परतत होते. भुसावळ भुसावळ ते नाशिराबाद दरम्यान महामार्गावर त्यांच्या खाजगी वाहनांचे टायर फुटले दुरुस्तीला दोन तास वेळ लागणार असल्याने ते संपुर्ण कुटुंब झाडाच्या सावलीत विश्रांतीसाठी थांबले होते .

भावाला उतरवुन दुचाकीस्वार त्याच्या बहिणीला घेऊन पसार

कुटुंब थांबलेले असतांना एक अज्ञात ३२ ते ३५ वर्ष वय असलेला तरुण दुचाकीवरुन आला. त्याने अंगात पांढरा रंगाचा शर्ट व मिलिटरी रंगाची पॅन्ट घातलेली होती. मजुराच्या कुटुंबातील तरुणाला दुचाकीस्वार अज्ञात तरुणाने मी सुद्धा अकोला जात असून तू व तुझ्या बहिनीला मी अकोला येथे सोडून देतो असे सांगितले. त्यानुसार १९ वर्षीय भाऊ व त्याची बारा वर्षाची बहिण या दोघांना दुचाकीवर बसवले व मार्गस्त झाला. डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयाच्या पुढे काही अंतरावर पोलीस दिसल्याने दुचाकीस्वाराने गाडी थांबवली. मागे बसलेल्या तरुणाला उतरण्याचे सांगत तु चालत चालत ये मी पुढे थांबतो असे दुचाकीस्वार म्हणाला . तरुण उतरताच त्याच्या बहिणीला सोबत घेत दुचाकीस्वार तरुणाने दुचाकी पळवली व पसार झाला.

भुसावळ ते अकोला दरम्यान केली नाकाबंदी ; पथकेही रवाना
भावाने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या बहिणीच्या अपहरणाबाबत नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला . सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ . पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी गुन्हा दाखल होताच सर्व पोलिस यंत्रणा तत्काळ कामाला लावली तसेच भुसावळ ते अकोला पावेतो तात्काळ नाकाबंदी लावून कर्मचार्‍यांची पथके रवाना केलीत. दरम्यान आज सकाळी अमरावती ग्रामीणचे लोणी पोलीस स्टेशन चे हद्दीत मुलगी सुखरूप मिळून आली.

महामार्गावर दरम्यान एका ठिकाणी संशयित तरुण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. त्यानुसार संशयित तरुणाचे नाव गणेश बांगर (रा.मालेगाव, ता.वाशिम) असे निष्पन्न झाले असून त्याच्या शोधार्थ जळगाव पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. दरम्यान, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.