जिल्हा पोलिस प्रशासनाची आता पेपरलेसकडे वाटचाल!

0

जळगाव। जिल्हा पोलिस प्रशासनाने देखील डीजीटल इंडिया होण्याकडे वाटचाल सुरू केली असून त्या अनुषंगाने नागरिकांच्या सेवेसाठी पोलिस प्रशासनातर्फे ‘सीटीझन पोर्टल’ कार्यान्वीत करण्यात आले. त्या माध्यमातुन पोलीस जनतेशी जवळीकता साधण्याच्या प्रयत्नात आहे. यासोबतच नागरिकांना आता ऑनलाईन तक्रारी करता येईल आणि काही माहिती हवी असेल तर ती या पोर्टलवर त्यांना सहजच मिळेल. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाची हळुहळु पेपरलेसकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी पत्रपरिषदेत दिली.

पोर्टलवर लॉग इन आयडी आवश्यक
पेपरलेस कार्यालय या वातारणाशी निगडीत होण्यासाठी सीटीझन पोर्टल महत्वाचे ठरणार आहे. या पोर्टलची माहिती व मार्गदर्शनासाठी राज्यातील अपर पोलीस अधिक्षकांची पुणे येथे कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. त्यात राज्य सीआयडी अधिकारी संदीप सिंघल व संजिव कुमार यांनी मार्गदर्शन केले. या पोर्टलच्या माध्यमातुन तक्रारदाराला तक्रार देता येणार आहे. त्यासाठी पोर्टलवर लॉग इन आयडी बनविणे आवश्यक आहे. एक आयडी बनविल्यानंतर पुन्हा आयडी बनविण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

अशी होते प्रक्रिया
पोर्टलवर तक्रार केल्यानंतर संबधीत पोलीसठाण्यात ती जाते. तक्रारीची माहिती तेथील पोलीस निरीक्षकाला मिळते.तक्रारीची चौकशी होवून तसा अहवाल पोलीस अधिकार्‍याला मिळतो. भ्रमणध्वनीवरून देखील अशा प्रकारे तक्रार दाखल करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पीडीएफ फाईल संकेतस्थळावर अपलोड केली जाते. तक्रार अपलोड करावी किंवा नाही याचे अधिकार पोलीस निरीक्षकांना आहेत.त्यांच्याकडुन ती तक्रार उपपोलीस अधिक्षकांकडे जाते ते तक्रार प्रसिध्द करायची किंवा नाही याचा निर्णय घेऊ शकतात.

दोन भाषेत पोर्टल
या पोर्टलवर सर्व्हीस साईड आणि तक्रार साईड अशा दोन साईड आहेत. तसेच मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे पोर्टल आहे. सर्व्हीस साईड मध्ये पासपोर्ट, चरित्र पडताळणी आदी सेवांसाठी तर तक्रार साईडमध्ये अर्ज, निवेदन,तक्रार आदी करता येणार आहे.हे पोर्टल कार्यान्वीत झाल्या पासून 2 हजार 500 लोकांनी त्यास भेट दिली आहे. पोर्टलच्या माध्यमातुन खोट्या तक्रारींना आळा बसणार आहे. तसेच पोर्टलवर अनोळखी मृतदेहांची माहिती व छायाचित्र प्रसिध्द केले जाणार आहे.डिजीटल प्रणालीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन बच्चन सिंह यांनी केले आहे.