कॅमेरा, स्पीडगन, ब्रेथ अनॉलायझर अद्ययावत यंत्रणा व्हेईकलमध्ये कार्यान्वित
(किशोर पाटील)
जळगाव- गेल्या काही वर्षांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाकडून ’इंटरसेप्टर व्हेइकल’ खरेदी करण्यात आल्या आहेत. यात लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन, ई-चलन यंत्रणा, मद्यपींवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अॅनलायजर अशी अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या तीन ’इंटरसेप्टर व्हेइकल’ जिल्हा पोलीस दलात दिवाळीच्या मुहूर्तावर दाखल झाल्या आहेत. कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच या व्हेईकलमार्फत तपासणी तसेच कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे येथे दसर्याला अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या हस्ते वितरण
राज्यातील अपघातांमध्ये मरण पावणार्यांची धक्कादायक अशी आकडेवारी आहे. खराब, अरुंद रस्त्यांसह रस्त्यांसह या अपघातांमध्ये बेशिस्त वाहनचालक ही कारणीभूत आहेत. अनेक वाहनचालक मद्यप्राशन करून, वाहने चालवितात. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळते. महामार्गावरील बेशिस्तीला आळा घालण्यासाठी पोलिस दलाने इंटरसेप्टर व्हेइकल खरेदी केल्या. पुणे जिल्ह्यातील औंध येथे दसर्याच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगांवकर, पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते या व्हेईकल वितरीत करण्यात आल्या. महाराष्ट्रातील विविध पोलीस आयुक्तालय व तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्येकी दोन ते तीन इंटरसेफ्टर व्हेईकल याप्रमाणे विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 96 व्हेईलकचे वितरण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यात तीन इंटरसेफ्टर व्हेईकल दाखल
जळगाव जिल्ह्यात पाळधी महामार्ग पोलीस, चाळीसगाव महामार्ग पोलीस व शहर वाहतूक शाखा अशा जिल्हा पोलीस दलाच्या तीन विभागांच्या ताफ्यात तीन इंटरसेफ्टर व्हेईकल दिवाळीच्या मुहूर्तावर दाखल झाल्या आहेत. त्या -त्या विभागात नियुक्त चालकाचे नावाने या व्हेईकल देण्यात आल्या आहेत. त्या घेण्यासाठी गेलेल्या चालकासह कर्मचार्यांना व्हेईकलमधील अद्ययावत यंत्रणेबाबत एक दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यानुसार प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या सहकार्यांना तसेच अधिकार्यांना कर्मचार्यांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. शहर वाहतूक शाखेत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर हे व्हेईकल दाखल झाले असून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या हस्ते गाडीचे पूजन केल्यानंतर ही कार तपासणीसाठी रस्त्यावर धावणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांनी सांगितले.
पाळधी महामार्ग विभागाची ‘व्हेईकल’व्दारे 5 वाहनांवर कारवाई
पुणे येथील वितरण कार्यक्रमाचे वेळी पाळधी महामार्ग विभागाचे चालक कपिल चौधरी, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील मेढे, पोलीस नाईक घनशाम पवार गेले होते. 1 दिवसाचे प्रशिक्षण घेवून कर्मचारी 16 तारखेला परतले असून इतरांना त्यांच्याकडून प्रशिक्षण दिले जात आहे. तपासणीसाठी व्हेईकल महामार्गावर धावत असून या व्हेईकलव्दारे आतापर्यंत महामार्गावर काचांना मर्यादेपेक्षा अधिक काळया फिल्म लावलेल्या पाच वाहनांवर कारवाई करण्यात आला असून दंड वसूल करण्यात आला असल्याचे घनशाम पवार यांनी बोलतांना सांगितले.
‘इंटरसेप्टर व्हेइकल’मध्ये अशा आहेत सुविधा
- ’इंटरसेप्टर व्हेइकल’मध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून, स्पीडगनद्वारे कारवाई केली जात होती. आता नव्या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. एखादे भरधाव वाहन जर गेले व स्पीडगनव्दार त्याचा वेग मर्यादपेक्षा जास्त असल्याचे कळते. त्यानुसार व्हेईकलमधील कॅमेर्याव्दारे 300 मीटरपर्यंतच्या वाहनाचे छायाचित्र काढले जाते. व वाहनाच्या क्रमांकावरुन थेट वाहन मालकाला थेट ई चलन पाठविले जाते.
- इंटरसेप्टर व्हेइकलच्या माध्यमातून होणार्या कारवाईमुळे पोलिसांकडे पुरावे उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन यंत्रासह अन्य सुविधांचा समावेश या वाहनात आहे.
- मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी या वाहनात ब्रेथ अॅनलायजर यंत्रणा उपलब्ध आहे. मद्याच्या नशेत वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्यांविरोधात जागेवरच कारवाई करणे आता शक्य होणार आहे.
- 75 मायक्रॉनपेक्षा कमी काळी फिल्म वाहनांच्या काचांवर लावण्यास बंदी आहे. या व्हेईकलमध्ये वाहनांच्या काचांवरील फिल्मची तपासणी करण्यात येवून तपासणीनंतर जागेवर संबंधित वाहन मालकाला चलन दिले जाणार आहे.
जिल्हा पोलीस दलात पाळधी महामार्गा, चाळीसगाव महामार्ग व जळगाव शहर वाहतूक शाखा या ठिकाणी इंटरसेफ्टर व्हेईकल मिळाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात अपघातांची वाढती संख्या व त्यातील बळी ही गंभीर बाब आहे. त्या पार्श्वभूमिवर या अद्ययावत वाहनाची पोलीस दलाला तसेच संबंधित विभागांना मोठी मदत होईल. या वाहनामुळे कारवाईला सुरुवात झाल्यावर बेशिस्त वाहतुकीला लगाम लागेल. तसेच मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या चालकांवरही तात्काळ कारवाई झाल्याने अपघातासारखी गंभीर घटना टळेल. त्यामुळे काही प्रमाणात का होईना या व्हेईकलमुळे अपघातांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. – डॉ.पंजाबराव उगले , जिल्हा पोलीस अधीक्षक