जिल्हा बँकांसमोर शिवसेनेचे ’ढोल बजाओ‘

0

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य सरकारने दीड लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली. ज्या शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा लाभ झाला, अशा शेतकर्‍यांची यादी जाहीर करावी, या मागणीसाठी पुणेसह औरंगाबाद आणि नाशिकमध्ये शिवसेनेकडून सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकांसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली म्हणून पाठ थोपटून घेऊ नका. तर सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी खरोखरच जिल्हा बँकांकडून शेतकर्‍यांना मिळत आहे की नाही याची यादी बँकांकडे मागा. कर्ज थकले म्हणून शेतकर्‍यांच्या दारावर नोटिसा लावणार्‍या जिल्हा बँकांच्या दारावर ढोल बडवून कर्जमुक्त शेतकर्‍यांची यादी मिळवा, गावागावात-खेड्यापाड्यात जाऊन त्याची पडताळणी करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार सोमवारी शिवसैनिकांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवा आंदोलन केले. पुणे जिल्हा बँकेसमोर झालेल्या आंदोलनात महिला शिवसैनिकांची संख्या लक्षणीय होती. 34 हजार कोटींचा पारदर्शक हिशोब द्या, पारदर्शक कर्जमुक्ती दाखवा, आत्महत्या थांबवा, सरसकट शब्द पाळा, असे फलक हातात घेतलेल्या शिवसैनिकांनी केलेल्या या आंदोलनाची पुण्यात जबरदस्त चर्चा सुरू होती.

राज्यभरातील जिल्हा बँकांसमोर आंदोलन
कर्जमाफीची घोषणा 28 जूनरोजी झाली. घोषणा होऊन दोन आठवडे झाले आहेत. असे असतानादेखील अद्याप कोणत्या शेतकर्‍यांना लाभ झाला यांची काहीही माहिती नाही. शेतकर्‍याकडून कर्जाचे हप्ते थकले की बँकेचे अधिकारी दारावर नोटीस लावतात. कर्जमाफी झाल्यानंतर मात्र त्याची माहिती दिली नाही. त्यामुळे कर्जमुक्त शेतकर्‍यांची यादी तात्काळ द्यावी या मागणीसाठी शिवसेनेने हे आंदोलन केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर कर्जमाफी जाहीर झालेल्या शेतकर्‍यांच्या नावाची यादी आंदोलकांनी मागितली. नाशिक येथील आंदोलनादरम्यान, संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, बळीराजाची फसवणूक थांबवलीच पाहिजे अशा विविध घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. पुण्याप्रमाणेच नागपुरातही जबरदस्त असे आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार कृपाल तुमाने यांनी स्वत: केले. रत्नागिरी जिल्हा बँकेसमोर खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

उद्धव ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी
राज्य सरकारने 40 लाख शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आणि 89 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र सरकारच्या या घोषणेची अंमलबजावणी पारदर्शकपणे होते की नाही हे पाहण्याचे कर्तव्य शिवसैनिकांचे आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी जिल्हा बँकांसमोर ढोल वाजवून, बँकांना निवेदन देऊन कर्जमुक्त शेतकर्‍यांची यादी मिळवा. त्याचप्रमाणे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकर्त्यांनी बँकांसमोर बसून, कर्जमाफीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सहकार्य करावे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शिवसैनिक पुढे सरसावला आहे.