जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी ९४.०८ टक्के मतदान

आज होणार फैसला ; महाविकास आघाडीच्या ११ जागा बिनविरोध

जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० जागांसाठी रविवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी ९४.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली. जिल्ह्यातील २८५३ मतदारांपैकी २६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. दरम्यान उद्या दि. २२ रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्हा बँक येथे मतमोजणी होणार आहे.
कोरोनामुळे तब्बल दीड वर्ष लांबलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक प्रक्रिया रविवारी १५ मतदान केंद्रावर शांततेत पार पडली. जिल्हा बँकेची निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी सुरूवातीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षिय पॅनलची संकल्पना मांडली. त्यानुसार भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तीन बैठकाही झाल्या. मात्र काँग्रेसने भाजपासोबत जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट करीत वेगळे पॅनल करण्याचा इशारा दिला. राज्यात भाजपाकडुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना तपास यंत्रणाच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याने राष्ट्रवादीनेही भाजपासोबत जाणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सहकार पॅनल या रिंगणात उतरले. महाविकास आघाडीत स्थान न मिळालेल्या असंतुष्ट उमेदवारांनी शेतकरी पॅनलच्या झेंड्याखाली आव्हान उभे केले. काँग्रेसचे नेते डी.जी. पाटील, राष्ट्रवादीचे विकास पवार, भाजपाचे जि.प. सभापती रवींद्र पाटील यांनी शेतकरी पॅनलचे नेतृत्व केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे ११ उमेदवार आधीच बिनविरोध निश्‍चीत झाले. त्यामुळे उर्वरीत १० जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. १० जागांसाठी जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रावर ९४.०८ टक्के मतदान झाले.
आज मतमोजणी
जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या दि. २२ रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्हा बँकेच्या सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.