जिल्हा बँकेत धडकले सीबीआयचे पथक

0

जळगाव । नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकेत अंदाजे लाखो, करोडो रुपयांचा भरणा झाला होता. अवघ्या तीन दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम बँकेत जमा झाल्याने आज गुरूवारी सकाळीच 9.30 वाजता सीबीआय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण) चे सहा ते सात अधिकार्‍यांचे पथक जिल्हा बँकेच्या मुख्यशाखेत अचानक येवून धडकले व त्यांनी मुख्य शाखेची तपासणी केली. याबरोबर पथकातील काही जणांनी अमळनेर व चोपडा शाखांचीही तपासणी केली. तसेच जमा झालेल्या रक्कमेमुळे सीबीआयने ही चौकशी सुरू केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अभिकोष व सांख्यिकी विभागात तपासणी
जिल्हा बॅँकेत चार जणांचे पथक होते. त्या शिवाय बीएसएनएल व रेल्वे विभाग असे प्रत्येकी दोन या प्रमाणे 4 पंच साक्षीदार सोबत घेण्यात आले होते. या पथकाने सुरुवातीला अभिकोष व सांख्यिकी विभागात कागदपत्रांची तपासणी केली. ही तपासणी सुरु असतानाच या विभागाचे व्यवस्थापक पी.एस.पाटील यांच्या दालनात साडे अकरा वाजता या पथकासाठी नाश्ता मागविण्यात आला होता. नाश्ता झाल्यानंतर पथक तेथून कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या दालनात गेले. यानंतर पथकाने भरण्याबाबत त्यांना विचारपूस केली, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.

बॅँकेत स्मशान शांतता
सीबीआयच्या या पथकात 5 पुरुष व 1 महिला अधिकार्‍यांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी 9.30 वाजताच हे पथक जिल्हा बॅँकेच्या मुख्य शाखेत दाखल झाले. यावेळी कार्यालयात शिपाई व सुरक्षा रक्षकाशिवाय कोणीच नव्हते. कर्मचार्‍यांना सीबीआय पथक तपासणीसाठी आल्याचे कळताच त्यांनी ही माहिती बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना दिली. ते लागलीच काही वेळातच बॅँकेत दाखल झाले. बाहेरील पथक आल्याच्या पार्श्वभूमीवर बॅँकेत स्मशान शांतता होती. तर बाहेरच्या व्यक्तीला जिल्हा बँकेत प्रवेश नाकारण्याता आला होता. तर आलेल्या लोकांचीही नोंद सुरक्षा रक्षकाकडे घेतली जात होती.

पत्रकार व नागरिकांना प्रवेश बंदी
जिल्हा बँकेत दुपारी बारा वाजेनंतर बाहेरील व्यक्ती तसेच पत्रकारांना बॅँकेत प्रवेश नाकारण्यात आला होता. प्रवेशद्वाराजवळच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. बॅँक कर्मचारी व महत्वाचे काम असलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जात होता. तशी नोंद सुरक्षा रक्षकाकडे घेतली जात होती. नेमके कोण अधिकारी आहेत हे दुपारपर्यंत निम्म्याहून अधिक स्टापला माहितही नव्हते.

दुपारपर्यंत पथकाकडून बँकेत तपासणी करण्यात येत होती. यातच सीबीआयच्या पथकातील काहींनी अमळनेरसह चोपडा शाखाही गाठून तेथील तपासणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. यातच कार्यकारी संचालकांनी सायांकाळी पत्रकारांशी बोलणे देखील टाळले