जळगाव – जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्तेवर असलेेल्यांविषयी शेतकर्यांमध्ये मोठी नाराजी आहे. सत्ताकाळात शेतकरी हिताची जी कामे व्हायला हवी होती ती झाली नसल्याचे सांगत काँग्रेसचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरच निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी जिल्हा बँक अध्यक्षांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करून राजीनामानाट्य केले होते. आता काँग्रेसचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनीही जिल्हा बँकेत शेतकर्यांची कामे होत नसल्याचे सांगून खडसेंवरच निशाणा साधला आहे. शेतकर्यांच्या नाराजीची उणीव भरून काढण्यासाठीच काँग्रेसने स्वतंत्र पॅनल देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. आता खडसे यावर काय उत्तर देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.