जिल्हा बँक कर्जाचे वनटाईम सेटलमेंट हा चुनावी जुमलाच

0

विरोधी पक्षनेते डॉ. सुनील महाजन यांचा आरोप
आ.राजुमामा भोळे यांच्यावर टिका

जळगाव । आमदार सुरेश भोळे यांनी आमदारांनी या बाबत कोणतीही माहिती न घेता नुसतेच जिल्हा बँकेच्या कर्ज फेडीसाठी वन टाईम सेटलमेंटचा प्रस्ताव बँकेला देण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. परंतु हा दावा म्हणजे चुनावी जुमला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते डॉ. सुनील महाजन यांनी केला आहे.

मनपाच्या सोळाव्या मजल्यावर डॉ. सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, तत्कालिन जळगाव नगरपालिकेने सन 1997 ते 2001 या कालावधीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विविध विकास कामे व शिक्षण मंडळातील कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते अदा करणे आणि हुडको कर्ज परतफेड, वाघुर पाणी पुरवठा योजनेकरीता 60 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यानंतर दि.21 मार्च 2003 रोजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. त्यावेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात कर्ज फेडीसंदर्भात दाखल याचिकेवर तत्कालिन आयुक्त व जिल्हा बँक यांनी आपसात चर्चा करुन मनपाने जिल्हा बँकेला व्याज व मुद्दल असे मिळून वर्षाला 12 कोटी रुपये देण्याचे हमी पत्र मनपाने न्यायालयात दिले. त्यामुळे न्यायालयाने कर्ज फेडीसंदर्भात दाखल याचीका खारीज केली. यापुर्वीच मनपाने दि.29/9/2006 रोजी जिल्हा बॅकेला एकरकमी कर्ज परत फेडीचा प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला जिल्हा बँकेने प्रतिसाद न दिल्यामुळे पुन्हा मनपाने दि.29 मे 2008 रोजी बँकेत एकरकमी कर्ज परत फेडीसाठी प्रस्ताव सुधारीत व्याजदराने देण्यात आला. तसेच मनपाने बँकेत भरलेली सर्व रक्कम 50 टक्के मुद्दलात व 50 टक्के रक्कम व्याजात वर्ग करण्याचा प्रस्ताव दिला होता व या रिशेड्युलींग प्रस्तावास दि.7 फेब्रुवारी 2009 रोजी महासभेत ठराव क्रमांक 154 करुन मंजुरी घेण्यात आली होती. परंतु यात कोणताही तोडगा निघाला नाही.