भुसावळ : जिल्हा बँक निवडणुकीसाठी आखाडा रंगत असतानाच भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांचा विकास सोसायटी गटातून अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या संदर्भात चौधरी यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले आहे. या अपिलावर 26 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता सुनावणी आहे. या सुनावणीला उपस्थित न राहिल्यास अपिलकर्त्याचे काही एक म्हणणे नाही, असे समजून निकाल दिला जाईल, असे विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी म्हटले आहे.
निर्णयाकडे लागले लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत महाविकास आघाडीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ, माधुरी अत्तरदे व भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. चौधरी यांनी अर्ज बाद झाल्यानंतर सहकारी संस्थेचे नाशिक विभागीय निबंधक यांच्याकडे अपिल दाखल केले आहे. या अपिलावर मंगळवार, 26 रोजी दुपारी एक वाजता नाशिक येथील गडकरी चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या निकालाकडे आता राजकीय दिग्गजांचे लक्ष लागले आहे.