विधानपरिषदेसाठी प्रतिक्षा कायम
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा दूध संघात सर्व पक्षीय मिळून चांगले काम होत असून दोघीही ठिकाणी प्रगती होत आहे. त्यामुळे या वेळीही जिल्हा बँक निवडणूक सर्व पक्षीय पॅनल करून लढविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे एकनाथराव खडसे यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा बँक निवडणूक घेण्याविषयी न्यायालयाचे आदेश आहे. या बाबत शासन आदेशानंतर जिल्हा बँकांच्या निवडणुका होणार असल्याचे खडसे म्हणाले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे आज जळगाव दौर्यावर होते. यावेळी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली असता खडसे यांनी सांगितले की, राज्यसभेच्या उमेदवारीची आपल्याला अपेक्षा नव्हती. विधानपरिषदेसाठी माझी मागणी आहे. राज्याच्या राजकारणातच आपल्याला रस आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले असुन या उमेदवारीची प्रतिक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांच्यासह एकनाथराव खडसे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा गेल्या आठवड्यात होती. यात खडसे यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर या विषयावर खडसे म्हणाले की, घरात अगोदरच खासदार असल्याने एका घरात दोन पदे नको म्हणून राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही हे माहिती होते असे खडसे यांनी स्पष्ट केले.