जिल्हा बँक निवडणुकीसाठी 852 ठराव प्राप्त

0

जळगाव: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातून आजपर्यंत 852 ठराव प्राप्त झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 31 जानेवारीपर्यंत ठराव सादर करण्याची अंतिम मुदत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी सहकारी संस्थांसह इतर संस्थांकडून ठराव मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यात 876 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या असून, आत्तापर्यंत 399 ठराव प्राप्त झाले आहेत. इतर संस्थांमधून 453 ठराव प्राप्त झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

जिल्हा बँकेत सध्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर ह्या अध्यक्षा आहेत. बँकेत सर्वपक्षीय पॅनेलची सत्ता आहे. राज्यात नुकतेच सत्तांतर झाले असून, महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतही आघाडीचा पॅटर्न राबविला जातो की पुन्हा एकदा सर्वपक्षीय पॅनल होते? याकडे जिल्हावासियांचे लक्ष
लागून आहे.

राष्ट्रीयकृत बँकांमधील 321 खाती आधारविना

महाविकास आघाडीने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला अद्याप सुरवात झालेली नाही. सहकारी बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकर्‍यांच्या आधार संलग्नित असलेल्या खात्यांची माहिती मागविण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 321 खाती व जिल्हा बँकेची 65 खाती आधारविना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही खाती आधारशी संलग्नित करून माहिती पाठविल्याशिवाय शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.