जिल्हा बँक निवडणूक : भुसावळचे आमदार संजय सावकारे रींगणात
वेळेच्या बंधनामुळे राहिला उमेदवारी अर्ज : आमदार म्हणाले, आता निवडणूक लढणार
जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रंगत आली असतानाच अचानक भाजपाने सोमवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याची घोषणा करीत सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याची घोषणा माजी मंत्री व भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, भाजपाने निवडणुकीत माघार घेतली असलीतरी ऐनवेळी झालेल्या निर्णयामुळे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्यासह भाजपातील काही पदाधिकारी वेळेत पोहोचू न शकल्याने त्यांचे अर्ज राहिल्याने उभयंतांना आता निवडणूक लढवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भुसावळचे आमदार म्हणाले ; निवडणूक लढणार
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वेळीच पोहोचू न शकल्याने निवडणूक अर्ज माघारी घेता आला नाही त्यामुळे आता जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार आहे. विकास सोसायटी मतदारसंघातून आपण अर्ज दाखल केला आहे.
चुरशीची होणार निवडणूक
भुसावळ तालुक्यातून आमदार संजय सावकारे व वरणगावचे शांताराम धनगर यांचा विकास सोसायटी गटातून अर्ज बाकी राहिला असून दुसरीकडे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. या अपिलावर बुधवार, 17 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असलेतरी विकास सोसायटी गटाची निवडणूक चुरशीची ठरेल, असा अंदाज आता राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे.